
सिंधुदुर्गातील सर्व एस.टी. डेपोत लॉटरीचे स्टॉल लावण्यास परिवहन विभागाचा हिरवा कंदील !!
सिंधुदुर्गातील सर्व एस.टी. डेपोत लॉटरीचे स्टॉल लावण्यास परिवहन विभागाचा हिरवा कंदील !!
शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या पाठपुराव्याला यश !
राज्यातील सर्व एस.टी. डेपोमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रीचे स्टॉल लावण्यास मंजुरी देण्यात यावी याकरिता परिवहन मंत्री ना.अनिल परब यांच्याकडे शिवसेना लॉटरी विक्रेता सेना व आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यामार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. याला अखेर परिवहन विभागाने हिरवा कंदील देत पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग मधिल सर्व एस.टी. डेपोत अधिकृतरित्या लॉटरी विक्रीचे स्टॉल लावण्यास परवानगी दिली आहे. तसेच येत्या काही दिवसांत राज्यातील सर्व एस.टी. डेपोमध्ये लॉटरी विक्रीचे स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे ही परिवहन विभागाने स्पष्ट केले असल्याचे लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष श्री.मनोज वारंग यांनी सांगितले.
एस.टी. डेपोमध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. याप्रवाशांना लॉटरी तिकीटे डेपोमध्ये खरेदी करण्यास उपलब्ध झाली तर प्रवाशी ही तिकिटे खरेदी करू शकतात. या स्टॉलमधून राज्य लॉटरीची तिकीटाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. शिवाय शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगाराचे साधनही उपलब्ध होऊ शकेल असे आमदार डॉ. किणीकर तसेच लॉटरी सेनेचे अध्यक्ष श्री.मनोज वारंग, सरचिटणीस श्री. सिद्धेश पाटील व खजिनदार श्री.अविनाश पाटील यांच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री ना.परब यांची भेट घेत त्यांच्या निदर्शनास आणले होते.
परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे लॉटरी विक्रेत्यांना दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी श्री. वारंग यांनी यावेळी व्यक्त केली.