MPSC परीक्षेच्या प्रश्नसंच फुटीप्रकरणी वॉन्टेड आरोपींना अटक !!

MPSC परीक्षेच्या प्रश्नसंच फुटीप्रकरणी वॉन्टेड आरोपींना अटक !!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या प्रश्नसंच फुटीप्रकरणी वॉन्टेड आरोपींना अटक !!


        MPSC - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गातील एकूण १५४ पदांकरीता (जाहिरात क्र. ११६/२०२५) दिनांक २२/०३/२०२६ रोजी महाराष्ट्रातील ०६ परीक्षा केंद्रांवर चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या गोपनीयतेचा व निष्पक्षतेचा भंग करून लोकसेवक म्हणून सोपविण्यात आलेल्या शासकीय कर्तव्याचा गैरवापर करण्यात आल्याचे तसेच आर्थिक फायद्यासाठी प्रश्नसंचाची अनधिकृत देवाणघेवाण करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झालेवरुन त्या अनुषंगाने कलम ११२, ३१६(४), ३१६ (५), ३१८(४), २३८ (ब), ३१७(२), ३०३(२), ६१ (२), ३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम ११(१) (२) (३), १२(१) (२) महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम, २०२४, तसेच कलम १३ (२), १३(१) (अ) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सुधारणा २०१८) अन्वये कायदेशीर प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. मंगेश देसाई यांनी दिनांक २५/०८/२०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


       विशेष पोलीस तपास पथकाने शिताफीने व तांत्रिक पद्धतीने तपास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गोपनिय कक्षातून तज्ञांनी निवड केलेल्या प्रश्नसंचाच्या प्रती तयार करून त्या आर्थिक फायद्यासाठी गैरमार्गाने बाहेर काढून अनधिकृतरित्या प्राप्त करून घेतल्याच्या प्रकरणात सहभाग असलेले अवर सचिव अभिजीत लेंडवे, गोपनिय कक्षात काम करणारा सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, कौटील्य अॅकडमीचे संचालक प्रविण पाटील सह इतर मध्यस्थ अमृत पाटील, लोकेश उर्फ गौरव पाटील, संदिप खलाटे व भैरवनाथ कदम, तसेच प्रश्नसंच प्राप्त करुन औषध निरीक्षक पदाची परिक्षा देणारे उमेदवार ऋतुजा पाटील, साजिद संदे व विजय किंगर यांना यापुर्वी अटक करण्यात आली होती.


       गुन्हयाच्या अधिक तपासात निष्पन्न बाबींच्या अनुषंगाने गैरमार्गाने प्रश्नसंच उमेदवारास मिळवुन देणारा मध्यस्थी वॉन्टेड आरोपी मयुर ठाकरे यास दि. १२/१०/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्हयातील आरोपी अभिजीत लेंडवे यांचेकडुन प्रश्नसंच प्राप्त करणारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील सहायक कक्ष अधिकारी रोहित कोलटक्के यांना नवी मुंबई येथुन विशेष तपास पथकाने दि. २३/१०/२०२६ रोजी अटक केली आहे. आतापर्यंत याप्रकरणी अटक आरोपींची संख्या १३ झाली आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे