
महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणूका लांबणीवर !!
महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणूका लांबणीवर !!
राज्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातलेल्या १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, नागपूर आशा मोठ्या महापालिकेचा समावेश आहे. राज्यातील १० महापालिकांची मुदत फेब्रुवारी २०२२ आणि २५ जिल्हापरिषदांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपत आहे.
राज्य सरकारने राज्यातील महापालिकांच्या प्रभागाची आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्या वाढीसाठी राज्य सरकार २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अध्यादेश आणणार आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदांच्या गटांची फेर रचनेची प्रक्रिया त्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे आणखी विलंब लागण्याची चिन्ह आहेत. सदस्य संख्या वाढणार असल्याने राज्यातील सर्वमहापालिकेत प्रभागाची आणि जिल्हापरिषदेत गटांची फेररचना करावी लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडायला उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत. मुदत संपणाऱ्या १० महापालिकांमध्ये मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड अमरावती, सोलापूर, अकोला, नागपूर या बड्या महापालिकांचा समावेश आहे. मार्च २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या २५ जिल्हा परिषदांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हापरिषदांचा समावेश आहे.
आधीच राज्यातील औरंगाबाद, नवी मुंबई, वसई- विरार, कल्याण, डोंबिवली या महापालिकांची आणि कोल्हापूर या महापालिकांच्या निवडणुका करोनामुळे प्रदीर्घ काळ रखडल्या आहेत.