विदेशात नोकरीचे आमिष दाखवणारी टोळी गजाआड !!
विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन वेगवेगळ्या राज्यांतून आरोपींना केली अटक.
मस्जिद बंदर (पश्चिम) येथील अल शिफा ट्रॅव्हल्स या कार्यालयातून विदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर पायधुनी पोलिस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली आहे.
सदर गुन्हयातील आरोपींनी फिर्यादीला तसेच इतर इच्छुक उमेद्वारांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे मूळ पासपोर्ट, बायोडाटा आणि प्रत्येकी रु. १५,०००/- ची रक्कम घेऊन त्यानंतर कोणतीही नोकरी न देता त्यांची फसवणूक केली व त्यानंतर नमूद कार्यालय तसेच त्यांचे वापरते मोबाईल बंद करून आरोपी पसार झाले होते.
फिर्यादीच्या तक्रारीवरून मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 886/2026 कलम 318(4), 336(2), 336(3), 340 (2), 3 (5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पायधुनी पोलीस पथकाने नमुद गुन्हयातील आरोपी १) तबरेज आलम अन्सारी यास हरियाणा राज्यातून २) मोहम्मद शमीम अन्सारी यास मधुबनी, बिहार राज्यातून तर ३) व्यंकटेश गंगव्या चकल यास जे. जे. डॉरमेट्री, टेमकर स्ट्रीट, मुंबई येथून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून 50 भारतीय पासपोर्ट, 6 संगणक लॅपटॉप, 9 मोबाईल हँडसेट, 13 बँक चेकबुक्स / डेबिट कार्ड/आधार कार्ड, पॅनकार्ड, वोटींग कार्ड, 2 बनावट नेमणूक पत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
आतापर्यंत केलेल्या तपासात एकुण 10 व्यक्तींची फसवणुक झाल्याचे निष्पन्न असून, फसवणुक झालेल्या व्यक्तींची संख्या 50 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. तरी अशा प्रकारे कोणत्याही नागरिकांची फसवणुक झाली असल्यास त्यांनी तात्काळ पायधुनी पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.
सदरच्या गुन्हे तपासाची उत्कृष्ट कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, माननीय पोलीस सह आयुक्त श्री. मनोजकुमार शर्मा (कायदा व सुव्यवस्था), माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री. शैलेश बलकवडे (दक्षिण प्रादेशिक विभाग), माननीय पोलीस उप आयुक्त श्रीमती रागसुधा आर. (दक्षिण परिमंडळ 02), सहाय्यक पोलीस आयुक्त पायधुनी विभाग श्रीमती रेणूका बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय कदम, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोंविद फड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रज्जाक शेख, पोलीस हवालदार घोडे, पवार, पोलीस शिपाई इतापे, पाटील, तुंडीवाले, कुटुबेर काळेल, पाटील, कदम, जगदेव यांनी केली आहे.