अंमली पदार्थ विरोधी कारवाईकरीता आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज विशेष व्हॅनची प्रभावी कारवाई !!
अंमली पदार्थ विरोधी कारवाईकरीता आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज विशेष व्हॅनची प्रभावी कारवाई !!
अंमली पदार्थाची तस्करी व वितरण रोखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज Anti-Narcotics Investigation and Forensic Van ही विशेष व्हॅन तयार करण्यात आलेली आहे.
सदर विशेष व्हॅनचे उद्घाटन मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते दि. २१/११/२०२६ रोजी करण्यात आले.
या वाहनाच्या माध्यमातून घटनास्थळीच संशयित अंमली पदार्थाचे प्राथमिक परीक्षण, नमुना संकलन, घटनास्थळाचे छायाचित्रण व व्हिडिओ नोंदणी तसेच जप्त पुराव्यांचे योग्य व्यवस्थापन अशा विविध प्रक्रिया एकाच ठिकाणी पार पाडण्यास मदत होणार आहे.
या विशेष व्हॅनचा प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे दिनांक २२/११/२०२६ रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित AEDEN या लाईव्ह म्युझिक कार्यक्रमाच्या ठिकाणी सदर व्हॅन तैनात करण्यात आली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या तरुणांची अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान अंमली पदार्थांचे सेवन केलेले आढळून आलेल्या एकूण १२ व्यक्तींविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
या विशेष व्हॅनमुळे गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तसेच अंमली पदार्थ सेवन व वितरणाच्या संभाव्य ठिकाणी तात्काळ तपासणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या सेवनास प्रतिबंध करणे, तस्करी व वितरणावर नियंत्रण ठेवणे तसेच अंमली पदार्थाविरुद्धच्या मोहिमेला अधिक प्रभावी गती देणे शक्य होणार आहे.
बृहन्मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत अंमली पदार्थमुक्त मुंबईच्या दिशेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई सातत्याने करण्यात येत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी ही माननीय श्री. देवेन भारती - पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, माननीय श्री. अनिल कुंभारे - पोलीस सह आयुक्त (गुन्हे), माननीय श्री. कृष्णकांत उपाध्याय - अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली माननीय श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रींगी - पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई व माननीय श्री. सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे नेतृत्वाखाली अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, वरळी युनिटचे पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील, व्हॅनवरील अधिकारी पोलीस उप निरीक्षक रोहित साळी व पथक यांनी केली आहे.