
देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, आमदार भाई जगताप !!
देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, आमदार भाई जगताप !!
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करोना संकटात मुंबईकरांच्या मदतीसाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांविषयी माहिती देण्यात आली तसेच संकटकाळात मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जगताप यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे तसेच ३० एप्रिलला लॉकडाऊन संपल्यावर देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर व भाजपा विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात रेमिडेसीवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली आहे. मुंबईतील महानगरपालिका व सरकारी इस्पितळांमध्ये हे इंजेक्शन्स उपलब्ध आहेत. परंतु खाजगी इस्पितळांमध्ये त्याची अजून पुरेशी उपलब्धता नाही. किंबहुना संपूर्ण देशामध्ये या इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. यासाठी केंद्र सरकारने ११ एप्रिलला या इंजेक्शनची निर्यात बंद करण्याचे आदेश दिले. देशातील नागरिकांसाठी हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला कारण या रेमिडिसीवीरच्या अभावी देशातील कित्येक लोक दगावत आहेत. परंतु केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे महाराष्ट्राला मात्र या इंजेक्शन्सचा पुरेसा साठा मिळत नाही आहे. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्र द्वेष्टे आहे. हे रेमिडिसीवीर इंजेक्शन्स खरेदी करण्याचा व ते इस्पितळांमध्ये उपलब्ध करून देण्याचा अधिकार संपूर्णपणे राज्य सरकारला आहे. दुसरा कुणीही मग तो कोणताही राजकीय पक्ष असू देत, तो इंजेक्शन्स थेट खरेदी करू शकत नाही. परंतु असे असताना सुद्धा दमणच्या ब्रुक फार्मा या कंपनीने या इंजेक्शनचा पुरवठा राज्य सरकारला न देता पावणे पाच कोटींची इंजेक्शन्स परस्पर भाजपाला दिली. ही इंजेक्शन्स कोणत्या आधारावर दिली, कशासाठी दिली याचे उत्तर त्यांच्याजवळ नाही. या कंपनीने इंजेक्शन्सचा अवैधरित्या साठा करून ठेवला होता, याची चौकशी करण्यासाठी ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा त्या मालकाला सोडवायला रात्रीच भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तिथे गेले. या मालकावर काळाबाजार करण्याच्या आरोपावर गुजरात पोलिसांनी सुद्धा कारवाई केलेली आहे. त्या संशयित एक्सपोर्टर राजेश डोकानियावर पोलीस यंत्रणा, कस्टम यंत्रणा व FDI बारीक लक्ष ठेऊन होते. त्यांचा साठा जप्त करून चौकशी करण्याकरिता मुंबई पोलिसांनी या कंपनीच्या मालकाला बोलावले. तेव्हा अशा माणसाला सोडविण्यासाठी हे नेते ताबडतोब रात्रीच तिकडे गेले. देवेंद्र फडणवीस हे देखील महाराष्ट्र द्वेष्टे आहेत. ते पाच वर्षे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला अधोगतीला नेण्याचेच काम त्यांनी केले.
देवेंद्र फडणवीसांना रात्रीचे खेळ करण्याची खूप सवय आहे. या आधीही आरे कॉलनीतील शेकडो झाडांची कत्तल त्यांनी रात्रीच केली. सरकार स्थापन्यासाठी शपथविधी कार्यक्रम सुद्धा रात्रीच्या अंधारात केला. आणि काल या साठेबाज कंपनीच्या मालकाला सोडवायला सुद्धा हे रात्रीच गेले. यातूनच भाजपचा व भाजपच्या नेत्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकाला वाचविण्याचा प्रयत्न भाजपचे नेते का करत आहेत ? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून इंजेक्शन्सचा साठा प्रथम महाराष्ट्रालाच मिळायला हवा. माझी अशी राज्य सरकारकडे मागणी आहे की, सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी. तसेच ३० एप्रिलला महाराष्ट्रातील लॉकडाऊन संपल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि भाजप पक्षा विरोधात रस्त्यावर उतरून मुंबई काँग्रेसतर्फे आम्ही मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष, आमदार भाई जगताप यांनी दिली.