
मराठी तरुणांना आयएएस, आयपीएस बनण्याची संधी, लालबागच्या राजाच्या वतीने होणार प्रशिक्षण !
मराठी तरुणांना आयएएस, आयपीएस बनण्याची संधी, लालबागच्या राजाच्या वतीने होणार प्रशिक्षण !
महाराष्ट्रातील मराठी तरुणांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविता यावे यासाठी ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय स्तरावर मराठी पताका फडकविण्यासाठी या परीक्षेची सखोल माहिती उमेदवारांना व्हावी यासाठी रविवार, १२ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मंडळाच्या वतीने ‘आयएएस, आयपीएस प्रशिक्षण शिबीर’ होणार आहे.
लालबाग चिवडा गल्ली येथील हनुमान मंगल कार्यालयात हे शिबीर पार पडणार आहे. शिबिरात केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्या विविध केंद्रीय सेवेंच्या पदांच्या परीक्षेसंदर्भात संपूर्ण माहिती व अभ्यासाची दिशा याविषयी उमेदवारांना विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिराचे उद्घाटन त्रिवेंद्रमच्या जिल्हाधिकारी प्रांजल पाटील (आयएएस) यांच्या हस्ते पार पडेल. सनदी अधिकारी होण्याच्या दृष्टीने त्या उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या शिबिराला चाणक्य मंडळाचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून ते ‘यूपीएससी परीक्षेचा विजयपथ’ या विषयावर उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. आयकर विभागाचे उपायुक्त ऋषिकेश उत्पात हे प्रशासकीय सेवेचे शिवधनुष्य पेलताना या विषयावर अनुभव कथन करणार आहेत. स्वप्नील मुंगळे हे यूपीएससी परीक्षेची संपूर्ण तयारी व मुलाखतकौशल्य या विषयावर मार्गदर्शन करतील.
७ जानेवारीपासून नोंदणी- हे प्रशिक्षण शिबीर विनामूल्य असून अधिकाधिक उमेदवारांनी याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी शिबिरात सहभागी होण्यासाठी ७ ते ९ जानेवारीदरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत लालबागचा राजा प्रबोधिनी, पेरू चाळ कंपाऊंड, डॉ. आंबेडकर रोड, लालबाग येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क – 02224715959 / 02224715958