
आरक्षणासाठी मराठा समाजाचे मुंबईत बाईक रॅलीचे आयोजन !
आरक्षणासाठी मराठा समाजाचे मुंबईत बाईक रॅलीचे आयोजन !
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने येत्या 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासंदर्भात आज दिनांक 19/5/2021 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे मराठी क्रांती मोर्चा तर्फे राजन घाग प्रवक्ता, संकेत भावकर, विजय पवार, प्रफुल पवार, विजय पवार तसेच प्रथमेश राणे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर, न्यायालयात आरक्षण टिकवण्यासंबंधी असलेल्या ह्या सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी मुंबईत मराठा समाजाच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे, निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्द झाला त्यामुळे मराठा समाजात मोठा असंतोष आहे. काल दि. १८ मे २०२१ रोजी मराठा क्रांती मोर्चा, मुंबई विभागाची पार पडलेल्या मीटिंगमध्ये हा असंतोष व्यक्त झाला. त्यासाठी मुंबईमध्ये मराठा समाजाचे आंदोलन करणे आवश्यक असल्याने यासंबंधात मुंबईतील मराठा समाजात जनजागृतीसाठी दि. २७ जून २०२१ रोजी मोठ्या प्रमाणात बाईक रॅली काढण्याचे ठरवले आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर उदभवलेली परिस्थिती मराठा समाजाच्या इतर मागण्यांची सद्यस्थिती व त्यावर करावयाच्या संभाव्य उपाययोजना यावर प्रामुख्याने चर्चा झाली. मराठा समाजाच्या आरक्षणाशिवायही इतर अनेक मागण्या आहेत त्यासंबंधात सरकारने केलेल्या वा न केलेल्या उपाययोजना. त्यातील प्रलंबित मागण्यांसाठी सरकारवर दबाव कसा निर्माण करता येईल. करोनाच्या वाढलेल्या धोक्याच्या व लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर कुठले आंदोलन कधी करता येईल यासंबंधीही प्रमुख समन्वयकांच्या उपस्थितीत विस्तृत चर्चा झाली.
यासंबंधी चर्चेअंती असे ठरले की लॉक डाऊन संपताच या सरकारच्या मराठा विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी, ह्या सरकारने न्यायालयात आरक्षण टिकवण्यासाठी केलेले अपुरे प्रयत्न, मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यासंबंधी केलेले अक्षम्य दुर्लक्ष व सरकारचा निष्काळजीपणा यासाठी ह्या सरकारविरोधात आंदोलन करणे जरुरीचे असल्याचे सर्वानुमते ठरले.
मराठा क्रांती मोर्चाचे आजपर्यंत जवळपास ६० मोर्चे निघाले. त्यात प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयकांनी आपापल्या जिल्ह्यात मोर्चे काढले. मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मराठा समाजाने भव्य मोर्चा काढला. परंतु आजवर मुंबई जिल्ह्याचा मात्र मोर्चा निघाला नाही. त्यामुळे मुंबईत मोर्चा काढण्याच्या शक्यतेवर साधक बाधक चर्चा होऊन त्यासाठी जनजागृतीसाठी मुंबईत रविवार दि. २७ जून २०२१ रोजी बाईक रॅली काढण्याचे सर्वसंमतीने ठरले.
सकल मराठा समाज, मुंबई, मराठा क्रांती मोर्चा, मुंबई तर्फे दि. २७ जून २०२१ रोजी मराठा समाजाच्या मागण्या व भविष्यात होणारे आंदोलन यासंबंधी मुंबई व परिसरातील मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे ह्या निष्क्रिय आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत बाईक रॅली काढण्यात येणार आहे.