दिग्गज अभिनेत्यांची गाजलेली मालिका “एक धागा सुखाचा” क्लासिक मनोरंजन वर !

दिग्गज अभिनेत्यांची गाजलेली मालिका “एक धागा सुखाचा” क्लासिक मनोरंजन वर !

        ‘जुनं ते सोनं’ म्हणतात. कारण जुन्या आवडीच्या गोष्टी रसिकांच्या कायम स्मरणात असतात, मग त्या आठवणी असो, एखादा प्रसंग असो किंवा चित्रपट अथवा मालिका ! मनोरंजन क्षेत्रात कालानुसार अनेक बदल घडत असले तरी एखादी जुनी दर्जेदार मालिका किंवा चित्रपट पुन्हा लागला तर तो आपण आजही आवर्जून पहातो. सांगायचं तात्पर्य असं की, साधारण २० वर्षापूर्वी गाजलेली मालिका “एक धागा सुखाचा” पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘क्लासिक मनोरंजन’ हया यूट्यूब ओटीटी चॅनेलवर येत आहे. 

      “एक धागा सुखाचा” ही २६ भागांची मालिका त्यावेळी खूप लोकप्रिय झाली होती. आयुष्यात अनेक संकटे येतात, मन सैरभैर होतं, शब्दांचे अर्थ बदलू लागतात, श्वासही जीवघेणा होतो, जगणंही व्यर्थ भासू लागतं. अशा परिस्थितीत चुकीचं पाऊल उचललं जाण्याची शक्यता असते. पण, एक धागा सुखाचा आपलं आयुष्य बदलून जातो. असा संदेश देणार्याी “एक धागा सुखाचा” मालिकेनं रसिकांच्या हृदयात घर केलं. एस जे इंटरनॅशनल प्रस्तुत हया मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन दासबाबू यांनी केलं होतं. एका बंगाली व्यक्तीने मराठी मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन करणं आव्हानात्मक असतं. पण ते आव्हान त्यांनी सहजरीत्या पेललं. मराठी भाषा बोलता येत नसली तरी त्यांनी आपलं कौशल्य दिग्दर्शन क्षेत्रात दाखवून सर्वांना अचंबित केलं होतं. अर्थातच त्यांना आपले मराठी लेखक, गायक आणि कलाकार यांची साथ होतीच. हया मालिकेची कथा, पटकथा, संवाद व शीर्षक गीत अनिल हर्डीकर यांनी लिहिलं होतं तर शीर्षक गीत प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी गायिलं होतं. स्वप्ना दास – गडकरी हया मालिकेच्या सहनिर्मात्या होत्या.



 

 

  ही मालिका अभिनेते विक्रम गोखले, चंद्रकांत गोखले, सुहास जोशी, नयनतारा, जयंत सावरकर, आनंद अभ्यंकर, किशोर प्रधान, विजय कदम, विजय चव्हाण, सोनालिका जोशी, संतोष जुवेकर, अनिल हर्डीकर, अजित केळकर, उमेश कामत या कलाकारांच्या सहजसुंदर उत्कृष्ट अभिनयाने सजली होती. यातील चंद्रकांत गोखले, नयनतारा, आनंद अभ्यंकर, किशोर प्रधान, विजय चव्हाण हे दिग्गज कलाकार आज आपल्यात हयात नाहीत. मात्र त्यांचा अविस्मरणीय अभिनय हया मालिकेत रसिकांना पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हया मालिकेला मटा सन्मान पुरस्काराचे ‘उत्कृष्ट अभिनेता – विक्रम गोखले’, ‘उत्कृष्ट अभिनेत्री - सुहास जोशी’, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजय कदम’, ‘उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नयनतारा’, ‘उत्कृष्ट गायक – सुरेश वाडकर’, आणि ‘उत्कृष्ट मालिका – एक धागा सुखाचा’ अशी सहा नामांकन मिळाली होती.

        उत्कृष्ट निर्मिती आणि दिग्दर्शन, हृदयस्पर्शी कथा, श्रवणीय शीर्षक गीत, सुमधुर संगीत आणि दिग्गज कलाकारांचा जीवंत अभिनयाने रसिकांच्या पसंतीस उतरलेली “एक धागा सुखाचा” ही मालिका शुक्रवार दि. १ जानेवारी, २०२१ पासून ‘क्लासिक मनोरंजन’ हया यूट्यूब ओटीटी चॅनेलवर प्रदर्शित होत आहे. सदर मालिका दर शुक्रवारी दुपारी २ वाजता रसिकांना पहायला मिळणार आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week