
मुंबई मराठी पत्रकार संघ निवडणूक, अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे तर कार्यवाहपदी संदीप चव्हाण !!
मुंबई मराठी पत्रकार संघ निवडणूक, अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे तर कार्यवाहपदी संदीप चव्हाण !!
मुंबई, दि. 1: चार पॅनेल्स आणि त्यांचे तब्बल 63 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत गुरुवारी परिवर्तन पॅनलने 14 पैकी 10 जागा जिंकत बाजी मारली आहे. या पॅनलचे कार्यवाह या पदावर संदीप चव्हाण निवडून आले असून उपाध्यक्षपदाच्या दोन जागांवर शैलेंद्र शिर्के आणि स्वाती घोसाळकर हे दोन्ही उमेदवार जिंकले आहेत.
विशेष म्हणजे, कार्यकारिणी सदस्य पदाच्या 9 जागांपैकी 7 जागांवरही परिवर्तन पॅनलच्याच उमेदवारांनी विजयाचे निशाण फडकावले आहे. या निवडणुकीत दोन विश्वस्तपदावर राही भिडे आणि देवदास मटाले हे दोघे ज्येष्ठ पत्रकार निवडून आले आहेत. मटाले हे ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्या ' आपलं पॅनल' चे उमेदवार होते. विश्वस्तपदासाठी लढलेल्या अजय वैद्य आणि अनिकेत जोशी या दोन उमेदवारांची या निवडणुकीत निराशा झाली.
तर, पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विकासपूर्ती पॅनलतर्फे नरेंद्र वाबळे यांची फेरनिवड झाली आहे. त्यांच्या पॅनेलने अध्यक्षपदासह चार जागा मिळवल्या आहेत. त्यात नवनिर्वाचित कोषाध्यक्ष पदावरील जगदीश भुवड आणि आत्माराम नाटेकर, उमा कदम या दोघा कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.
गुरुवारी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असताना त्याला न जुमानता मतदार असलेल्या 541 पत्रकार सदस्यांपैकी 409 पत्रकारांनी मतदान केले. एकूण मतदान 76 टक्के इतके झाले. या निवडणुकीत कार्यकारिणी सदस्यपदाच्या 9 पैकी 7 जागांवर परिवर्तन पॅनलचे राजेंद्र हुंजे, किरीट गोरे, गजानन सावंत, दिवाकर शेजवलकर, राजेश खाडे, देवेंद्र भोगले, राजीव कुलकर्णी हे उमेदवार विजयी झाले आहेत.
निवडणूक रिंगणात उतरलेल्या ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव आणि प्रभाकर पवार यांच्या अनुक्रमे 'आपलं पॅनल' आणि ' प्रभाकर पवार पॅनल' यांना कार्यकारिणीतील एकसुद्धा जागेवर विजय मिळवता आलेला नाही.
*संजय परब, मंगेश वरवडेकर*
*यांना विजयाची हुलकावणी*
=================
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला आपला परिवर्तनाचा संकल्प साकार करण्यात लक्षणीय यश मिळाले आहे. पण या पॅनलचे अध्वर्यू अध्यक्षपदाचे उमेदवार संजय परब आणि कोषाध्यक्षपदाचे उमेदवार मंगेश वरवडेकर या दोघांनाही विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली आहे.
विश्वस्तपद (पदे २)
राही भिडे (विजयी) 221
देवदास मटाले (विजयी) 215
अजय वैद्य 154
अनिकेत जोशी 100
अध्यक्षपद
नरेंद्र वाबळे (विजयी) 131
संजय परब 119
प्रभाकर पवार 97
ज्ञानेश्वर महाराव 53
सुरेश वडवलकर 4
उपाध्यक्षपदे (2 पदे)
शैलेंद्र शिर्के (विजयी) 150
स्वाती घोसाळकर (विजयी) 141
सत्यवान ताठरे 103
प्रवीण काजरोळकर 93
दीपक परब 90
सुधाकर काश्यप 75
कार्यवाह
संदीप चव्हाण (विजयी)162
विष्णू सोनवणे 101
निशांत सरवणकर 97
पांडुरंग म्हस्के 38
कोषाध्यक्ष
जगदीश भोवड (विजयी) 148
मंगेश वरवडेकर 143
घनश्याम भडेकर 77
अमोल राऊत 24
कार्यकारिणी सदस्य (विजयी उमेदवार)
राजेंद्र हुंजे 146
किरीट गोरे 137
आत्माराम नाटेकर 135
गजानन सावंत 133
दिवाकर शेजवलकर 131
राजेश खाडे 124
देवेंद्र भोगले 124
उमा कदम 123
राजीव कुलकर्णी 121.