अर्धातास थरारक पाठलाग करून मोबाईल चोराला पकडले.

अर्धातास थरारक पाठलाग करून मोबाईल चोराला पकडले.

    वरळी बी.डी.डी. परीसरातील घटना ~ कर्तबगार बीट मार्शल रामचंद्र महाडीक यांचा पोलीस दलाकडून रोख बक्षीस देऊन गौरव !

     मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते आहे. पण, चोरलेला मोबाईल पोलीस तक्रार करून परत मिळविण्यापेक्षा त्यातील अनेक बाबींचा गैरवापर न व्हावा तसेच दुसरे सीमकार्ड मिळविण्यासाठी सोपस्कार म्हणून नागरीक केवळ हरवल्याची तक्रार करतात. त्यामुळे मोबाईल चोरीकडे अतिशय सामान्य बाब म्हणून पाहिले जाते. पण, वरळी पोलीस स्टेशनच्या एका बहाद्दर पोलीस हवालदाराने गस्तीवर असताना एकट्याने अर्धा तास थरारक पाठलाग करून एका मोबाईल चोराच्या मुसक्या आवळल्याची घटना वरळी बी.डी.डी. चाळ परीसरात घडली आहे. त्यामुळे धाडसी कर्तबगार पोलीस हवालदार रामचंद्र धनाजी महाडीक यांच्यावर पोलीस खाते आणि स्थानिक नागरीकांकडून रोख रकमेच्या बक्षिसांसकट कौतुकाचाही वर्षाव होत आहे.

         घटनाक्रम - पोद्दार हॉस्पिटलच्या मागच्या अभ्यास गल्लीत गुरविंदर सिंग नामक एका ६१ वर्षीय वृद्ध वाहनचालकाच्या हातावर प्रहार करून एक तरुण मोबाईल हिसकावून पळाल्याची घटना घडली. घटनास्थळी लोकांची गर्दी जमल्याचे पाहून गस्तीवर असलेले बीटमार्शल हवालदार रामचंद्र धनाजी महाडीक ह्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार लक्षात घेऊन काळा टी-शर्ट, काळी टोपी घातलेला, दूरदर्शन केन्द्राच्या दिशेला पळून गेलेल्या मोबाईल चोराच्या मागावर हवालदार महाडीक निघाले. चोर स्थानिक असावा, असा कयास बांधून तत्सम वेशभूषा असलेल्या तरूणांना हेरत त्यांनी संपूर्ण बी.डी.डी चाळींच्या गल्ल्या पिंजून काढल्या. त्यावर इमारत क्रं. २९ येथे त्यांना काळी टोपी-काळा टी-शर्ट घातलेला तरूण आरामात चालत असल्याचे आढळले. त्याच्या जवळ जाऊन चौकशीसाठी मार्शलदुचाकी स्टॅण्डवर लावत असताना त्या तरूणाने एका अरूंद गल्लीत जीवाच्या आकांताने धूम ठोकली. त्या गल्लीतून मार्शलदुचाकी जाणार नाही, हे लक्षात आल्याने हवालदार रामचंद्र महाडीकांनी धावत त्याचा माग घ्यायला सुरूवात केली. चोर स्थानिक असल्याने त्याला सर्व वाटा माहित होत्या, पण हवालदार महाडीकांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. जवळपास वीस मिनिटांचा चोर-पोलीसाचा धावपाठलाग सुरू होता. खाकीवेशातील हवालदार पळताना पाहून काही सजग नागरीकही पळालेल्या चोराची दिशा त्यांना दाखवत होते. अखेर, मोठ्या धाडसाने नालंदा बुद्ध विहार, महींद्रा हाऊसजवळ हवालदार रामचंद्र महाडीक यांनी त्या मोबाईल चोरावर झडप घातली. एका हातात चोराची गचांडी धरून महाडीक यांनी वॉकीटॉकीवरून पोलीस मदत मागवली. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याचे धाडस ऐकून पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हवालदार इनामदार व इंदुलकर यांच्यासह घटनास्थळी तातडीने हजर झाले.  


       वृद्ध तक्रारदार गुरविंदर सिंग यांनी दाखल तक्रारीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे आरोपी कडून हस्तगत केलेला रुपये दहा हजार किमतीचा एम आय कंपनीचा स्मार्टफोन आणि चोराला ओळखले. ड्युटी ऑफीसर पोलीस उपनिरीक्षक खोंडे, सहायक निरीक्षक शितोळे आणि साळुंखे यांनी ह्या प्रकरणाची चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. कलम ३९२ अंतर्गत वरळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     

      राजेश रमेश दाजिंगे, वय वर्षे २०, ह्या सासमिरा महाविद्यालयात कॉमर्स शाखा पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेला हा तरूण वरळी बी.डी.डी. चाळीत वास्तव्यास आहे. भौतिक सुख-चैनीसाठी पैसे कमी पडत असल्याने चोरी केल्याची कबुली देताना, हा प्रकार पहिल्यांदाच केल्याचा दावा त्याने व त्याच्या कुटुंबाने केला आहे. त्यामुळे वरळी पोलीस स्टेशन ह्या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करीत आहे.

       एकीकडे मोबाईल चोरीची तक्रार पोलीस दाखल करून घेत नाहीत, इथपासून ते पोलीसांची फीटनेस, अकार्यक्षमता, गुन्हेगारांवर पोलीसांचा वचक नाही. अशा अनेकविध बातम्या आपण सर्रास ऐकत असतो. पण, बीटमार्शल हवालदार रामचंद्र धनाजी महाडीक यांच्या सारख्या कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस जवानाने केवळ रूपरेषा वर्णनावरून एकट्याने जवळपास अर्ध्यातासाचा थरारक पाठलाग करून एका चोराला पकडल्याची घटना वरळी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक फडतरे यांनी वरीष्ठांना सांगितल्याने, झोन-३ चे उपायुक्त परमजीतसिंह दहिया यांनी हवालदार महाडीक यांना रोख रक्कम ५०००/- आणि अतिरीक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी रोख रक्कम ५००/- वैयक्तिक बक्षीस देऊन गौरव केला आहे. प्रत्येक पोलीस जवानाने रामचंद्र महाडीक प्रमाणे सतर्क राहून कर्तव्य बजावले पाहीजे आणि पोलीसदलाची शान उंचावली पाहीजे, अशी शाबासकी दिल्याने रामचंद्र महाडीक यांचेसह इतर सहकाऱ्यांचाही उर अभिमानाने भरून आला आहे. जीवाची पर्वा न करता एका मोबाईल चोराचा धावत पाठलाग करून एका वृद्ध सामान्य व्यक्तीला न्याय मिळवून दिल्याने वरळीतील नागरीकांनी पोलीसांप्रती समाधान व्यक्त केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरळी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week