
अपहरण झालेल्या चार महिन्याच्या बाळाला जुहू पोलिसानी शोधून काढल्याबद्दल राजेश मेहतांनी केला सत्कार !
अपहरण झालेल्या चार महिन्याच्या बाळाला जुहू पोलिसानी शोधून काढल्याबद्दल राजेश मेहतांनी केला सत्कार !
मुंबई जुहू परिसरातील झोपडपट्टीतून चार महिन्यांच्या बाळाची चोरी करून त्याची तेलंगणात विक्री करण्याचा डाव पोलीसांनी २५० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाचा मागोवा घेत त्याला शोधून काढणाऱ्या जुहू पोलीसांचा बुधवारी भाजपा उत्तर मध्य जिल्हा उपाध्यक्ष राजेश मेहता यांनी या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
चार महिन्याचे मुल दत्तक देण्याच्या बहाण्याने चार लाख रुपयांना एका डॉक्टरनेच या बाळाची विक्री केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महेश धमैय्या डिट्टी (३८), रमेश व्यंकट व्यंपत्ती (४२) आणि डॉ. मोहम्मद नसरुद्दीन बशीररुद्दीन (४६) यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पीडित मुलाचे कुटुंबीय जुहू परिसरात गोखले रस्त्यानजीकच्या झोपडपट्टीत वास्तव्याला आहे. पथारीवर फुलांची आणि इतर वस्तूंची विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. चार महिन्यांच्या बाळाची चोरी झाल्याची तक्रार या कुटुंबाने ११ नोव्हेंबरला जुहू पोलिसांकडे नोंदविली होती. ही गंभीर घटना असल्याने जुहू पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिभाऊ बिरादार आणि गणेश तोडकर यांच्या पथकाने जुहू परिसर आणि मुंबई शहरातील सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेरांच्या चित्रीकरणाची तपासणी केली. यात जुहू येथील गोखले रस्ता परिसरात एक रिक्षावाला संशयितरीत्या फिरताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी रिक्षाचालक रमेश याचा पत्ता शोधून अंधेरी परिसरातून ताब्यात घेतले. रमेशच्या चौकशीतून महेश याने मुलाची चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी महेश याला अंधेरी पश्चिम येथील गावदेवी डोंगर परिसरातून अटक केली.
चोरी केलेले मूल त्याने हैदराबाद येथील डॉ. बशीरुद्दीनला दिल्याचे महेश याने कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी एक पथक हैदराबाद येथे पाठवून बशीरुद्दीनला अटक केली. त्याने चार लाख रुपयांना हे मूल एका जोडप्याला विकले होते. त्यांच्याकडून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी दिली.
या जोडप्याला मूल होत नसल्याने त्यांनी दत्तक मुलाची मागणी बशीरुद्दीन याच्याकडे केली होती. मात्र बशीरुद्दीनने दत्तक देण्याच्या बहाण्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचा बनाव करून चार लाख रुपयांना या जोडप्याला मूल विकले. तर महेश आणि रमेश या दोघांना मिळून अडीच लाख रुपये त्याने दिले होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली. मुंबई पोलिस हे जगातील प्रथम क्रमांकावर असलेले पोलीस दल आहे. मुंबई पोलीस दल नेहमीच चांगले कार्य करत असते. कोरोनाच्या काळात देखील या मुंबई पोलीस दलाने रस्त्यावर उतरून खरंच उल्लेखनीय कार्य केले. या अपहरण झालेल्या ४ महिन्याच्या गरीब कुटुंबातील बाळाला त्यांनी हैदराबाद येथून सुखरूप परत आणले ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.
म्हणून मी त्यांचे पोलीस ठाण्यात जाऊन कौतुक केले असल्याची माहिती भाजपा उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष राजेश मेहता यांनी दिली.