
बाळासाहेबांचे होते खास..माजी महापौर अनंत तरे यांचे निधन !!
बाळासाहेबांचे होते खास..माजी महापौर अनंत तरे यांचे निधन !!
ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे आज ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. अनंत तरे यांच्यावर मागील दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. मात्र, सतत त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. तरे यांच्या निधनाने ठाण्याच्या जडणघडणीतील एक महत्त्वाचा दुवा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.
मेंदूतील रक्तस्त्रावामुळे अनंत तरे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे दोन महिने ते उपचार घेत होते. त्यातच त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे गुंतागुंत वाढत गेली आणि आज सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. तरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे व भाऊ असा परिवार आहे. तरे यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवार) दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.