
लोअरपरळ विभागातील समई हॉटेलमुळे नागरिक त्रस्त !!
लोअर परळ, सेनापती बापट मार्गावरील समई नावाच्या हॉटेलच्या मागील भागातून निघणारे मलमिश्रित सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे पादचाऱ्यांना आणि दुकानदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मलमिश्रित पाण्यातून पादचाऱ्यांना, तसेच या भागात कामासाठी येणाऱ्या कॉर्परिट कंपन्यांमधील नोकरदारांना दररोज चालावे लागते, तर दुकानदारांना या दुर्गंधीचा आणि डासांच्या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित वॉर्डकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरीही कार्यवाही झालेली नाही.
समई हॉटेल हे मातुल्यनाका सिग्नलजवळ सेनापती बापट मार्गावर स्थित आहे, तर त्याची मागील बाजू गणपतराव कदम मार्गावर आहे. या हॉटेलमधून बाहेर पडणारे मलमिश्रित सांडपाणी थेट गणपतराव कदम मार्गावर साचते. नेमके तिथे सिग्नल आहे.
स्थानिक हैराण, स्थानिकांच्या तक्रारीकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने, अनेक वेळा वाहने तिथे थांबलेली असतात, परिणामी नागरिकांना चालण्यासाठी पुरेशी जागाही राहत नाही. या परिसरात अनेक कॉर्पोरेट कंपन्या असल्यामुळे, तेथे येणाऱ्या असंख्य स्त्री-पुरुष नोकरदारांना हे सांडपाणी रोज तुडवत जावे लागते. तसेच वाहनांचे चाक या सांडपाण्यात पडल्यानंतर त्याचे शिंतोडेही पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असतात. गेल्या चार-पाच महिन्यांपासून नागरिक आणि दुकानदार या समस्येचा सातत्याने सामना करत आहेत.
या हॉटेलच्या समोरच जी दक्षिण महापालिका विभागाच्या सफाई विभागाचे कंटेनर कार्यालय आहे. संबंधित रस्त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या पालिका मुकादम यांच्याकडे या कार्यालयात अनेक नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या आहेत. दुकानदार आणि नागरिकांनी कार्यालयातही रीतसर तक्रारी दाखल केल्या आहेत. तरीही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्याने, आम्ही दर एक-दोन दिवसाआड या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करत असल्याचे तसेच, हॉटेलविरुद्ध आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. यामध्ये या हॉटेलचा परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात आल्याचे सांगितले.
(सौजन्य म.टा)