
पेण मळेघरवाडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून जलद गतीने आरोपपत्र दाखल करणार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
पेण मळेघरवाडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून जलद गतीने आरोपपत्र दाखल करणार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
(वार्ताहर - विश्वास गायकवाड) रायगड जिल्ह्यातील पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले.
आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे पीडित बालिकेच्या कुटुंबियांच्या घरी आले असता ते बोलत होते.
यावेळी आमदार महेंद्र दळवी, पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार,आदिवासी प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव,पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव,पेण तहसिलदार अरुणा जाधव उपस्थित होते.
यावेळी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पेण मळेघरवाडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा तपास काटेकाेरपणे पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी शासनाच्या मनोधैर्य याेजना व दक्षता समितीच्या माध्यमातून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे त्याचबराेबर पीडित कुटुंबाच्या राहत्या घराची परिस्थिती पाहून ते घर शासनाच्या योजनेतून परिपूर्ण बांधून देण्याची आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, असे त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निर्देश दिले.