कौसा येथील महापालिकेच्या रुग्णालयात सुविधांचा अभाव, आयुक्तांनी लक्ष घालण्याची माजी नगरसेवकाची मागणी !!

कौसा येथील महापालिकेच्या रुग्णालयात सुविधांचा अभाव, आयुक्तांनी लक्ष घालण्याची माजी नगरसेवकाची मागणी !!

      ठाणे - कौसा येथील ठाणे महापालिकेच्या हकीम अजमल खान रुग्णालयात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने या रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार माजी नगरसेवक जफर नोमानी यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून  केली आहे. आयुक्तांनी या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे व आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

      कौसा येथील मौलाना आझाद स्टेडियम शेजारी उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी अगोदरच आवश्यकतेपेक्षा वेळ लागला आहे व जास्त निधी खर्च झाला आहे, मात्र त्यानंतरही रुग्णालयाचे काम अपूर्ण आहे, असा आक्षेप नोमानी यांनी नोंदवला आहे. रुग्णालय सुरु करण्यात आले असले तरी ते पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आलेले नसल्याने रुग्णांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या रुग्णालयात 10 डायलेसीस मशीन उपलब्ध असताना केवळ पाच चालू करण्यात आल्या आहेत. शहरात डायलेसीसची गरज असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने सर्व मशीन वापरणे गरजेचे आहे. रुग्णालयात 6 निवासी डॉक्टरांची गरज आहे, तसेच बालरोग व स्त्री रोग तज्ज्ञांची गरज आहे. अतिदक्षता कक्ष तयार असला व त्यामध्ये आवश्यक ती यंत्रणा असली तरी हा कक्ष अद्याप सुरु करण्यात आलेला नाही. हा कक्ष त्वरित सुरु करण्याची गरज आहे. परिचारिकांची संख्या वाढवण्याची गरज आहे, या विविध समस्यांबाबत जफर नोमानी यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह पालिका उपायुक्त मनीष जोशी यांचे देखील लक्ष वेधले आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे