बेस्ट मध्ये झोलझाल, प्रवाशाचे दणदणीत पत्र !!

बेस्ट मध्ये झोलझाल, प्रवाशाचे दणदणीत पत्र !!

बेस्ट ‘सिडको’च्या वाटेवर, खाजगी चालकांनी माजवली लुट !

पुन्हा एकदा बेस्टच्या लुटीत अधिकाऱ्यांच्याच सहभागाची शक्यता ?

      आज दुपारी फादर एग्नेल आश्रम येथे दोन सहकारी संस्थांच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांशी बैठक होती म्हणून चेंबूरवरून निघालो. वांद्रे स्थानक (प.) येथे २११ च्या बस स्टॉपवर शुकशुकाट होता. प्रवासी व बस हे दोन्ही दिसून आले नाहीत. दूर स्टेशनजवळ खाजगी कंत्राटावर चालवण्यात येणाऱ्या बेस्टच्याच ३/४ एसी २११ बसेस उभ्या होत्या. कालच मी वर्तमानपत्रात कोरोना पसरवणाऱ्या या खाजगी बसेस विरोधात आवाज उचललेला होता. आज मला नाईलाजाने १ वाजून ५२ मिनिटांनी ती बस पकडावी लागली. तिकीट देणारा बेस्टचा वाहक ग्राउंड स्टाफ, त्याने खालीच तिकीट दिले व बस निघाली. दरवाजा बंद करताच एसीच्या थंड हवेचा प्रचंड झोत अंगावर आला. गारेगार वाटलं.

सोसायटीच्या मिटिंग संपल्यावर फादर एग्नेल आश्रम येथे पुन्हा बसची वाट पाहत उभा होतो. कंत्राटावर चालवण्यात येणारी एक एसी बस आली. मी आत बसलो. बेस्टची अंतिम स्थानकावरील चौकी बंद होती. ग्राउंड बुकिंगला एकही वाहक दिसत नव्हता. खाजगी चालकाने बस चालू केली. मध्ये चढणारे प्रवासी तो घेत गेला. मध्ये उतरणाऱ्या प्रवाश्यांकडून ६/६ रुपये घेत गेला. पुढे काय होणार ही मला उत्सुकता होती. त्याने आधी उतरायला सांगितलं तर गाडी पोलीस स्टेशनला घ्यायची हे प्लॅन्स मनात तयार होते, तसं घडलं नाही. गाडी ४.३९ वाजता पुन्हा वांद्रे स्थानकाजवळ पोहोचली. पुन्हा खाली उभ्या असणाऱ्या वाहकाने उतरणाऱ्या प्रवाश्यांना तिकीट दिली. मध्ये उतरलेल्या प्रवाश्यांकडून जमा केलेले पैसे चालकाच्या खिशात गेले.

बेस्टमध्ये काम करणाऱ्या वाहकाला १० रुपये शॉर्ट लागली तर बेईमानी केली म्हणून त्याची नोकरी जाते. त्याच्याविरोधात बेस्ट जनतेच्या पैश्याने हायकोर्टापर्यंत लढते. इथे खाजगी चालक बेस्टची लुट करताना मी उघड्या डोळ्याने पाहत होतो. खाजगी बसचालकाला एकेका ट्रीपला ३०/४० रुपये खिशात गेले तरी २००/३०० रुपये सुटतात, पगार वेगळाच.

बेस्टने खुलासे करण्याच्या फंदात पडूच नये. लोकांना अप आणि डाऊन हा तिकिटाचा फरक कळत नाही, मला कळतो. मी बेस्टचा माजी वाहतूक अधिकारी होतो व आता वकील आहे. एकाच डायरेक्शनची दोन्ही तिकिटे पुरावा म्हणून सोबत जोडतोय.    

ही बस पॉइंट टू पॉइंट नसून टप्प्याटप्प्याने जाणारी होती. लास्ट स्टॉपला ग्राउंड बुकिंगला एकही वाहक न नेमणे हीदेखील मोठी घोडचूक होती. या घोटाळ्याची खबर बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसेल असे मी समजत नाही. बेस्टच्या कैझन घोटाळ्यात मी आवाज उठवला होता. एक वरिष्ठ अधिकारी बेस्टमध्ये काम करत असताना दुसरी कंपनी काढून बेस्टला लुटत असल्याचे मी सिद्ध केले होते. त्याला चौकशी करून सोडून देण्यात आले. आज तोच भ्रष्ट अधिकारी अजून देखील बेस्टमध्ये अजून वरिष्ठ पदावर आहे.

मला माझ्या लहानपणचे दोन किस्से आठवले. पहिली गोष्ट माझ्या बाबांची. माझे वडील बेस्टमध्येच वाहक पदावर होते. त्यावेळी सायन ट्रॉम्बे या ३५२ च्या बस रुटवर तांदूळ व दारूची तस्करी चालायची. माझ्या वडिलांना पाहिलं कि त्यांच्या बसमध्ये शिरायची अशा कोणा तस्कराची हिंमत व्हायची नाही. ट्रॉम्बेसारख्या विभागात देखील एखादा विनातिकीट प्रवासी उतरल्यास खाली उतरून त्याला पकडून माझे बाबा तिकीट द्यायचे व कंपनीचे नुकसान होऊ द्यायचे नाहीत. त्यांच्यासारख्या इमानी लोकांमुळे बेस्ट वाढली. माझ्या बाबांनी माझ्यासाठी दीडशे कोटी रुपये ठेवले नाहीत, पण मला इमानदारीची शिकवण दिली ती मला मरेपर्यंत पुरेल.

दुसरी गोष्ट सिडकोची. लहानपणी पिवळ्या मंद दिव्यांची हिरव्या पिवळ्या रंगाची सिडकोची बससेवा वाशीच्या जुन्या मोडक्या खाडी पुलावरून दादर पनवेल चालायची हे आजही आठवतं. नवी मुंबईचीच वाहतूक सेवा म्हणून स्थानिकांची केलेली भरती आणि प्रवाश्यांना तिकीट न देता वाहकांच्या खिशात चाललेले पैसे यामुळे एक दिवस सिडको बंद झाली.

बेईमान अधिकारी, लोकनेते व कंत्राटदारांमुळे आता बेस्ट सिडकोच्या मार्गावर आहे. विनावाहक बसेस चालवून बेस्ट लुटायची कल्पना देणारा अधिकारी कोण हे शोधल्यास या घोटाळ्याचे सूत्रधार उघड होतील. बेस्टच्या काही वाहतूक अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केल्यावर त्यांनी बसमध्ये वाहक नसल्याने हे प्रकार मुंबईभर सर्रास घडत असल्याच्या घटनांना दुजोरा दिलेला आहे, पण “बेस्टचेच अनेक माजी अधिकारी या खाजगी कंपन्यांमध्ये काम करत असल्याने काहीही कारवाई होणार नाही” हे पण निक्षून सांगितलेले आहे. या प्रत्येक बसमध्ये सुरक्षेसाठी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, त्यांची रेकॉर्डींग तपासल्यास देखील या भ्रष्टाचाराचे पुरावे मिळतील.  

मित्रांनो, बेस्ट व्यवस्थापन या घोटाळ्याची चौकशी करेल ही शक्यता वाटत नाही. मी बेस्टमध्ये नसलो तरी बेस्ट माझ्यात आहे, माझ्या रक्तात आहे आणि बेस्टची दिवसाढवळ्या चाललेली लुट मी षंढ बनून पाहू शकत नाही. हा प्रकार निदर्शनास आणतोय, बेस्ट आपली आहे, बेस्ट वाचवा, आवाज उठवा.   

    प्रवासी     - एडव्होकेट प्रशांत साने  - 


Batmikar
रिपोर्टर - गणेश शिंदे

Most Popular News of this Week