विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये आमदारांमध्ये धक्काबुक्की !

विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये आमदारांमध्ये धक्काबुक्की !

     पीठासन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन !

      लोकशाहीचा खून - फडणवीस यांची टीका, ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा करताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या व नंतर पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांच्यासोबत धक्काबुक्की व शिवीगाळ करणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले.

      निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांचा समावेश आहे.

      विधानसभेत संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी हा प्रस्ताव मांडला व आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रस्ताव मंजूर झाल्यावर भाजपने कामकाजावर बहिष्कार घातला. हा लोकशाहीचा खून असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मोगलाईचे कामकाज असल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसी आरक्षणासाठी 12 काय भाजपचे सर्व 106 आमदार पूर्ण कालावधीसाठी निलंबित केले तरी पर्वा नाही असे फडणवीस म्हणाले. 

    फडणवीस म्हणाले, माझ्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत विधिमंडळ अधिवेशनात नेहमीच अशी बाचाबाची होण्याचे प्रसंग घडले मात्र त्यासाठी थेट निलंबनाची कारवाई केली गेलेली नाही. तालिका सभापती भास्कर जाधव काय बोलले ते मी येथे सांगू शकत नाही. त्यांना धक्काबुक्की झाली नाही. धक्काबुक्कीची वेळ आली होती मात्र आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली.

       2022 निवडणुकीपूर्वी ओबीसी आरक्षण मिळायलाच हवे व त्यासाठी आम्ही सरकारला बाध्य करु असे ते म्हणाले. न्या. दिलीप भोसले समितीच्या अहवालाप्रमाणे कार्यवाही केली जात नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे फडणवीस म्हणाले. 

      मराठा आरक्षण ठरावाबाबत सरकार मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. लग्न ठरलेले नसताना मुलाचे नाव ठरवण्याचा प्रकार राज्य सरकार करत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.


Batmikar
विशेष प्रतिनिधी - खलील गिरकर

Most Popular News of this Week