
युगप्रवर्तक जाणता राजा !!
मराठी लोकमाणसाच्या मंदिरचा गाभारा शिवराय या तेजोमय चेतानामय व वीरश्रीयुक्त या शब्दांनी भरलेला आहे. शिवाजी हे नाव उच्चारताच आदर श्रद्धा निष्ठा भक्तीभावनेने तो नतमस्तक होतो. म्हणून ३५० वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतरही या युगप्रवर्तक राजाची जयंती उल्हास उत्साहात साजरी होते. वीर वृत्ती शौर्य नेतृत्व संघटना कौशल्य मुत्सद्दीपणा राजनीती कुशाग्र बुद्धिमत्ता दूरदृष्टी धुरंधर सेनापती या गुण वैशिष्टांनी राजाचे व्यक्तीत्व मंडित असल्यामुळे अलौकिक असामान्य व लोकोत्तर महापुरुष म्हणून ते ओळखले जातात. प्रखर स्वधर्म निष्ठा असूनही परधर्मा बद्दल आदर पूज्यभाव त्यांच्या ठायी वसला होता. स्वराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी सर्व सामान्य माणसाचे सहकार्य घेऊन शून्यातून हिंदू राष्ट्र निर्मिती त्यांनी केली.
उत्तम चोख राज्य व्यवस्था, व्यापार, उदीम शेती, महसूल यावर भर. गडकोट किल्यांची निर्मिती अंतर्गत व बाह्य सुरक्षा व्यवस्था असे सर्व समावेशक धोरण महाराजांचे होते. असा हा धैर्य शौर्य चातुर्य साहसाचे प्रतीक असलेला पूर्णावतारी भूपती प्रजेविषयी सहृदयीपणा कळवळा आत्मीयता बाळगून असल्याने प्रजाहितदक्ष जाणता राजा असे यथार्थ वर्णन समर्थ रामदासांनी त्यांचे केले आहे.
अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारे आग्र्याहून सर सलामत बादशाच्या हातावर तुरी देऊन पसार होणारे, लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे तोडणारे, परस्त्रीला माते समान मानणारे असे शूरवीर पराक्रमी राजे शिवराय आपणास मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम..