पश्चिम बंगालमधील खुनाचा मुंब्रा मध्ये बदला, खुनाच्या आरोपींना बारा तासात अटक, मुंब्रा पोलिसांची कामगिरी !!
पश्चिम बंगालमधील खुनाचा मुंब्रा मध्ये बदला, खुनाच्या आरोपींना बारा तासात अटक, मुंब्रा पोलिसांची कामगिरी !!
मुंब्रा पोलिसांनी अवघ्या बारा तासात खुनाच्या आरोपींना अटक केली आहे. मुंब्रा कौसा परिसरातील देवरीपाडा येथे सोमवारी अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. मुंब्र्यातील चर्नीपाडा परिसरात राहणाऱ्या मोहम्मद इत्तेहाद अब्दुल वाहीद या २० वर्षीय तरुणाची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात हा पश्चिम बंगाल येथील एका खुनाच्या प्रकाराचा बदला असल्याचा प्रकार समोर आला. हा खुन करणाऱ्या आरोपीला बारा तासाच्या आत पोलिसांनी कसलाही धागादोरा नसताना तपास करुन ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणला आहे.
देवरीपाडा येथील झाडीझुडपांमध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळताच मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या मार्फत तपासाला प्रारंभ केला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा नोंद क. ८६८/२०२२ भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. मृत इसमाचा गळा कापण्यात आला होता व त्याच्या दोन्ही पायावर जखमा होत्या. मृत तरुण सध्या मुंब्रा येथे राहणारा मुळचा मालदा, पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले.
गुन्हे प्रकटीकरणाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे यांनी त्यांच्या पथकासहित तपासकामाला प्रारंभ केल्यावर तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन व घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल फोनच्या सहाय्याने आरोपी सानीफ आसु साही वय २६ वर्षे, मुळ गाव कहला, पोस्ट उत्तर लक्ष्मीपुर, जि. मालदा टाउन, या पश्चिम बंगाल मधील आरोपीला मुंबईतील बेहरामपाडा येथून ताब्यात घेतले व तपास केला.
सदर गुन्हा या आरोपीने त्याचा साथीदार झाकीर शेख सोबत केल्याची कबुली दिली. सानीफ साही याचा लहान भाऊ अलकरीम याचा मुळ गावी इत्तेहाद व त्याच्या इतर ७ साथीदारांनी ३ वर्षा पुर्वी खुन केला, असा आरोपीला संशय आहे. त्यामुळे त्यांनी बदला घेण्यासाठी मित्राच्या सहाय्याने सानीफचा मुंब्रा येथे येऊन रविवारी १८ सप्टेंबर रोजी खून केला, अशी कबुली दिल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणाचा तपास ठाण्याचे सह पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. कृपाली बोरसे, स.पो.नि. अजय कुंभार, उपनिरीक्षक मकानदार, हवालदार एस. ए. खरे, अजिज तडवी, तुषार महाले, पोलिस नाईक माळी, पोलिस शिपाई रुपेश शेळके, भूषण खैरनार, प्रमोद जमदाडे या पथकाने केला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम करीत आहेत.