मुंबई विमानतळावरील सहार कार्गो येथील ओमेगा इंटरप्राईजेस मध्ये पगारवाढ !
मुंबई विमानतळावरील सहार कार्गो येथील ओमेगा इंटरप्राईजेस मध्ये पगारवाढ !
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार कार्गो (सहार गांव) येथे गेल्या अनेक वर्षांपासून सेवा पुरविणाऱ्या ओमेगा इंटरप्राईजेस या कंपनीतील लोडर, ड्रायव्हर व सुपरवायझर या कामगारांच्या मासिक पगारात आणि इतर सोयी सुविधांमध्ये भरगोस वाढ करणारा सामंजस्य करार भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे यशस्वी झाला आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना सुद्धा अशा कठीण काळात कोणत्याही प्रकारे कामगार कपात होऊ न देता पुढील तीन वर्षांकरिता ५,४०० रुपये इतकी पगार वाढ करण्यात आली. त्यामध्ये २०२१-२२ ला २,६५०, २०२२-२३ ला १,४०० व २०२३-२४ ला १,३५० अशाप्रकारे पगारवाढ मिळणार आहे.
कामगारांना दरवर्षी जाहीर होणारा महागाई भत्ता पगाराव्यतिरिक्त भेटणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी पाच लाखांची मेडिक्लेम पॉलिसी व दहा लाखांची ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी देण्यात आली आहे. त्याचबरोबर लीव्ह (रजा) व इतर सुविधा सुद्धा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोना काळातील पहिल्या लाॅकडाऊनमध्ये म्हणजे एप्रिल आणि मे २०२० या महिन्यात कामावर हजर राहिलेल्या कामगारांना कृतज्ञता म्हणून दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत, त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हा करार माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, उपाध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस सचिन अहिर, संतोष चाळके यांच्या नेतृत्वाखाली चिटणीस संजय कदम यांनी ओमेगा इंटरप्राईजेस चे मालक मुत्थु थेवर यांच्यासोबत केला. यावेळी चिटणीस संतोष कदम, सहचिटणीस सुर्यकांत पाटील, विजय शिर्के, संजीव राऊत, राजा ठाणगे, मिलिंद तावडे, जगदीश निकम तसेच ओमेगा व्यवस्थापनाचे पुष्पम, आरती थेवर व इंदिरा थेवर, युनिट अध्यक्ष विजय गोसावी, उपाध्यक्ष प्रविण मोरे, गिरीष गद्रे, सेक्रेटरी अनिल कानडे, सदस्य अमित मोहीते, महेंद्र सुर्वे, संदीप केणी, गणेश वाळुंज, प्रविण पाटील, मनीष जाधव, कार्यकारिणी सदस्य संकेत बामणे, आरसा कुमार, कामराज नाडार, श्रीकांत घाग, आदि उपस्थित होते.