विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्यात माझी कोणतीही भूमिका नाही !!
विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्यात माझी कोणतीही भूमिका नाही !!
माझ्यावरील आरोप चुकीचे – राजन किणे यांचा खुलासा !!
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही. याबाबत माझ्यावर करण्यात येत असलेले आरोप अत्यंत चुकीचे असल्याचा खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राजन किणे यांनी केला आहे.
आव्हाड यांच्या विरोधात मुंब्रा पोलिस स्थानकात १२ वाजून २३ मिनिटांनी गुन्हा दाखल झाला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या घरी मध्यरात्री एक वाजता आले, याकडे किणे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही, असे किणे म्हणाले.
सुनिता सातपुते यांना नगरसेविका पदी निवडून देण्यामध्ये माझी महत्त्वाची भूमिका राहिली आहे, त्यामुळे गद्दार मी आहे की कोण आहे याचा विचार बोलण्यापूर्वी करावा असे ते म्हणाले.
राजकारणात काम करताना महत्त्वाकांक्षा असणे साहजिक आहे त्यामुळे मला देखील आमदार बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे, जितेंद्र आव्हाडांनी संधी दिली तर राष्ट्रवादीकडून आमदारकीची निवडणूक लढेन, असे सांगून राजन किणे यांनी आमदार होण्याची इच्छा खुणावत असल्याचे स्पष्ट केले. मुंब्रा मध्ये काहीही झाले तरी राजन किणे वर आरोप करण्याची फॅशन झाली आहे. माझ्याबाबत कोणीही आव्हाडांना चुकीची माहिती देतो त्यामुळे कोणीही काहीही माहिती दिली तर थेट माझ्याशी बोलून शंकानिरसन करणे गरजेचे आहे, मात्र तसे होत नसल्याने किणे यांनी नाराजी व्यक्त केली.
विद्यमान आमदाराला हटवा व मला आमदार करा, असे मी कधीच बोललो नाही. उलट आव्हाडांचेच कार्यकर्ते काम होत नसल्याची तक्रार करत असल्याचा आरोप किणे यांनी केला.
मी अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आहे, असे ते म्हणाले.