
शरद पवार यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचं उद्घाटन !
शरद पवार यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचं उद्घाटन !
प्रत्यक्ष काम आणि पुस्तकी ज्ञान यांचा सुंदर मिलाफ, राज्यातील विविध मंत्र्यांचीही उपस्थिती !
राज्यातील कृषी संशोधनाला आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी तरुणांना कृषी क्षेत्राची इत्थंभूत माहिती देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या डॉ. डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाचा व्हर्च्युअल उद्घाटन सोहळा गुरुवारी पार पडला. माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हर्च्युअली या विद्यापीठाचं उद्घाटन केलं. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील हे होते. तसंच या सोहळ्यासाठी राज्य सरकारच्या विविध खात्यांच्या मंत्र्यांनीही उपस्थिती दर्शवली.
कोल्हापूरजवळी तलसांडे येथे २०५ एकरच्या विस्तीर्ण परिसरात हे विद्यापीठ उभं राहिलं असून या विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रमांबरोबरच स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन, अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमही असतील. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठाचा अभ्यासक्रम खुला होईल. या अभ्यासक्रमात ५० टक्के पुस्तकी ज्ञान, ३० टक्के प्रत्यक्ष काम आणि २० टक्के प्रयोगातून शिक्षण अशी विभागणी असेल. मुलांना शेतीचं पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा प्रत्यक्ष कामातून शिकवण्याकडे आमचा कल असेल. भविष्यातील आव्हानं आणि संधी यांची माहिती होईल, अशा पद्धतीने आम्ही अभ्यासक्रम आखला आहे, असं डी. वाय. पाटील समुहाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी स्पष्ट केलं.
या विद्यापीठाच्या उद्घाटनासाठी राज्य मंत्रिमंडळातील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषि मंत्री दादाजी भुसे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी उपस्थित होते.
या कृषी विद्यापीठाचा भर मुख्यत्त्वे संशोधनावर असेल. विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना देऊन नवनवीन शोध लावण्याकडे आमचा कल असेल, असं राज्यमंत्री आणि डी. वाय. पाटील समुहाचे उपाध्यक्ष सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र हे मुख्यत्त्वे शेतीवर अवलंबून असलेलं राज्य आहे. त्यामुळे या विद्यापीठात झालेल्या संशोधनाचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होईल, असंही ते म्हणाले.
या विद्यापीठात विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याचा विचार करून आवडीचे अभ्यासक्रम निवडण्याची मुभा असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कौशल्यांचा विकास होईल, असं आमदार आणि डी. वाय. पाटील समुहाचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसह विद्यापीठ सामंजस्य करार करणार असून त्यातूनही विद्यार्थ्यांना अनेक दालनं खुली होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तलसांडे येथे असलेल्या या विद्यापीठामधील ४० हून अधिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याचंही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केलं.