
वी शिष्यवृत्तीने सांगलीतील १६ वर्षांच्या मुलीच्या कोडिंग शिकण्याच्या स्वप्नाला बळ पुरवले !!
वी शिष्यवृत्तीने सांगलीतील १६ वर्षांच्या मुलीच्या कोडिंग शिकण्याच्या स्वप्नाला बळ पुरवले !!
तबस्सुम गैबीसाहेब मानेर ही महाराष्ट्रातील सांगलीमधील १६ वर्षांची, अतिशय हुशार विद्यार्थिनी. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयात शिकणाऱ्या तबस्सुमला रोज शाळेत चालत जावे लागत होते. तिचे वडील वाहनचालक आहेत आणि कुटुंबाचा संपूर्ण आर्थिक भार त्यांच्या एकट्याच्या खांद्यांवर आहे. आई गृहिणी आहे, तसेच तबस्सुमला अजून एक बहीण देखील आहे. ८००० रुपये महिना उत्पन्न असलेल्या वडिलांना चार जणांचे कुटुंब एकट्याने चालवणे दिवसेंदिवस कठीण बनू लागले होते. मूलभूत गरजा कशाबशा भागत होत्या इतकेच !
तबस्सुम तल्लख बुद्धीची आणि मोठी स्वप्ने पाहणारी मुलगी, तिला तंत्रज्ञानाविषयी भारी जिज्ञासा वाटत असे, खासकरून कोडिंगसारख्या तांत्रिक बाबी आपण शिकून घ्याव्यात अशी तीव्र इच्छा तिच्या मनात होती. पण स्रोतसाधने आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध नसल्याने तिला पुढे काही करणे शक्य होत नव्हते.
गुरुशाळेकडून जेव्हा तिला वी शिष्यवृत्ती उपक्रमाबाबत समजले तेव्हा त्यामध्ये एक मोठी संधी असल्याचे तिने ओळखले आणि आपल्या महत्त्वाकांक्षांना मर्यादा घातल्या जाऊ नयेत यासाठी तिने त्याचा वापर केला. आपली गुणवत्ता आणि उत्कृष्ट कामगिरी यांच्या बळावर तिने शिष्यवृत्ती पटकावली. यामध्ये मिळालेल्या रकमेचा वापर करून तिने लॅपटॉप व पुस्तके विकत घेतली आहेत. आता यांचा उपयोग करून ती तिच्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करू शकते व आपले ज्ञानाचे क्षितिज अधिक व्यापक बनवू शकते.
या शिष्यवृत्तीमुळे तिला आपल्या स्वतःच्या क्षमता पारखण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. तबस्सुमला कोडिंग शिकायचे आहे आणि भविष्यात याच क्षेत्रात करिअर घडवायचे आहे. लॅपटॉपचा उपयोग आपली कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी आणि विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी करणार असल्याचे देखील तबस्सुम सांगते.