
उत्कर्ष सेवा मंडळांचे संस्थापक बाबी कदम कालवश !!
मुंबई करि रोड (पश्चिम ) येथील ना. म. जोशी मार्गा वरील उत्कर्ष सेवा मंडळाचे संस्थापक - बाबी तुकाराम कदम यांचे (२२फेब्रु.) अल्पशा आजाराने निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ८३ वर्षाचे होते.
डिलाईल रोड येथे १९ हरहरवाला इमारतीत उत्कर्ष सेवा मंडळाचे छोटेशे रोपटे लावले. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सुरुवातीस इमारतीत 'दत्त जयंती' उत्सव सुरू केला. इमारतींतील तरुण व होतकरू मुलांना एकत्र करून 'उत्कर्ष सेवा मंडळ' ची स्थापना केली. मंडळाच्या माध्यमातून कला-क्रीडा-शैक्षणिक-धार्मिक उत्सव सुरू केले.
तदकालीन माजी नगरसेवक-स्व. विवेक खाडये व शिवसेना माजी उपविभाग प्रमुख - शंकरराव बेळणेकर, माजी नगरसेवक- स्व. प्रभाकर शेलार यांच्या सहकार्याने मंडळाची वास्तू उभारली.
वास्तूत छोटीशी व्यायाम शाळा सुरू केली. ते स्वतः उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होते. प्रसिद्ध कबड्डी खेळाडू मधू पाटील, वसंत सूद, सदानंद शेट्ये यांच्या सोबत कबड्डी खेळले. अनेक कबड्डी सामने जिंकून मंडळाचे नाव महाराष्ट्रात उज्वल केले.
बाबी कदम हे नाट्य कलाकार व लेखक होते. त्यांच्या 'धग' एकांकिकेस लिखाणाचे प्रथम पारितोषिक मिळाले. 'असा पण हवालदार' या नाटकासाठी सिने-नाट्य अभिनेते- सुहास भालेकर यांनी दिग्दर्शन केले होते. मंडळास एकांकिक प्रथम, उत्कृष्ट स्त्री-पुरुष कलाकार, नेपथ्य, प्रकाश योजना इत्यादी अनेक पारितोषिके मंडळास मिळून दिली. प्रत्येक वर्षी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करीत असत, त्यामुळे मंडळाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झाले. सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना उत्तम भागवत, अनिल बळवल्ली यांचे बहुमोलाचे सहकार्य त्यांना मिळाले.
कै.कदम लालबाग येथील 'गॅस कंपनी' येथे कार्यरत होते. कंपनी बंद झाल्या नंतर त्यांची आर्थिक बाजू कमकुवत झाली. त्यांना डिलाईल रोड येथील घर विकावे लागले. नाशिक येथे छोटीशी नोकरी करून ते स्थायिक झाले. त्यांनतर त्यांच्या कडून सामाजिक कार्य बंद झाले. त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले.
कुटुंब सावरून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या निधनाने मंडळात दुःखाची पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातू असा परिवार आहे.