
"राष्ट्रकुट" मासिक रचनात्मक संवादाचे-प्रबोधनाचे माध्यम ठरावे !!
"राष्ट्रकुट" मासिक रचनात्मक संवादाचे-प्रबोधनाचे माध्यम ठरावे !!
महाराष्ट्रातील प्रबोधनाची आणि संवादाची बुद्धिवादी परंपरा अतिशय कळकळीने "दर्पण" पासून आजपर्यंत अनेक दैनिके, नियतकालिके यांच्यासह प्रयोगशील द्रष्ट्या संपादकांनी - लेखकांनी राबविली. राष्ट्रकुट मासिक स्वतःचे विचार जगाला सांगण्यासाठी नव्हे तर भारतीय समाज विलक्षण संक्रमणा काळातून जात आहे त्याच्यासाठी हे मासिक रचनात्मक संवादाचे माध्यम ठरावे असे मत मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी व्यक्त केले.
प्रकाश ओहळे व राजन देसाई संपादित राष्ट्रकुटच्या पहिल्या मासिकाचे प्रकाशन रणजित सावरकर आणि रवींद्र मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. एकेकाळी सत्यकथा, माणूस, किर्लोस्कर आणि अलीकडे अंतर्नाद यासारखी तरुण लेखक, वाचक घडवणारी नियतकालिके बंद पडली. लोकाश्रयाखाली महाराष्ट्रात हजारांच्या संख्येने खप असलेले यापैकी एखादे मासिक असू नये हे मराठी समाजाच्या वैचारिक सुदृढतेचे लक्षण नाही असेही त्यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले.
कार्यकारी संपादक राजन देसाई उपस्थितांचे स्वागत करताना म्हणाले की, करोनाच्या जगभराच्या हानीनंतर आम्ही या क्षेत्रात पाऊल टाकत आहोत, अर्थात 'नवीन दृष्टिकोन चांगले वाचन चांगली प्रेरणा' हे ध्येयवाक्य आमच्या समोर आहे. निर्भेळ सुसंस्कृत वाचन संस्कृतीला पुढच्या काळात एक पोषक आहार देण्याचा आम्ही संकल्प केला आहे. रणजित सावरकर, प्रा डॉ लीना केदारे यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला साहित्यिक, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.