
प्रिंट मीडियाची विश्वासार्हता कायम : आमदार मनीषा कायंदे !
प्रिंट मीडियाची विश्वासार्हता कायम : आमदार मनीषा कायंदे !
वाहिन्यांच्या तुलनेत बातम्यांचे आणि घटनेचे विश्लेषण वर्तमानपत्रात अजुनही चांगले होते. त्यामुळे छापील वर्तमानपत्रांनी आपली विश्वासाहर्ता वाहिन्यांच्या तुलेनेत अजुनही टिकवून ठेवली आहे. वर्तमानपत्र संपणार अशी ओरड खुप वर्षांपासून चालु आहे पण अजूनही वर्तमानपत्र सुशेगात चालू आहेत.
प्रसारमाध्यमांत आणि त्यातही विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांत लाईव्ह प्रसारणाचं आलेलं फॅड म्हणजे कोणतंही तारतम्य नसलेली, पिसाटलेली आणि अक्षरश: उबग आणणारी पत्रकारिता आहे. अर्थातच यात काही सन्माननीय अपवाद आहेत. असे मनोगत विधान परिषदेच्या आमदार आणि शिवसेना प्रवक्त्या प्रा. मनीषा कायंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती आणि पत्रकार दिनाचे, दादर येथील धुरू हॉल येथे आयोजन केले होते, त्याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्या पुढे असेही म्हणाल्या की, स्पर्धेमुळे प्रकाश वृत्तवाहिन्या (न्यूज चॅनेल्स), तसंच वेब पत्रकारितेत ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि ‘लाईव्ह’चा धुमाकूळ सुरू असून त्यात मुद्रित माध्यमांचीही ससेहोलपट होत असल्यानं सर्वच माध्यमांच्या वृत्तसंकलनात एक प्रकारचा ‘लोडेड’ पिसाटलेपणा आलाय. त्यामुळे माध्यमांचा तोल बिघडत चालला आहे. आणि याचबरोबर या क्षेत्रात पत्रकारिता करणारे मानसिक ताणतणावांना सामोरे जात आहेत. सोशल मीडियात आधाराबाबत विश्वासार्हता नसल्याने समाजमान्यता मिळत नाही, यातून अनेक सामाजिक धोके निर्माण होत आहेत. सोशल मीडियाचे आव्हान नव्हते आणि राहणारही नाही. परंतु पुढच्या काळात निष्पक्ष पत्रकारिता करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन प्रिंट मीडियाला कार्यतत्पर (अपडेट) व्हावे लागेल.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे आणि आयुर्वेदातील ख्यातनाम डॉ. कुशल केळशीकर यांचीही कोरोनाच्या गेल्या १० महिन्याच्या काळातील सर्वसामान्यांच्या मूलभूत समस्यांवर भाषणे झाली.
संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना संस्था जागेच्या कोणत्या अडचणीतून जात आहे, याचा आढावा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रास्ताविकात केला. ७२ वर्षांची वृत्तपत्र लेखकांची चळवळ महाराष्ट्राच्या राजधानीत टिकली पाहिजे, सरकारी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले असता, आमदार मनीषा कायंदे यांनी ही अडच सोडविण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी दादर सार्वजनिक वाचनालयाचे दिवंगत प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कोरोना या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन केलेल्या विश्वनाथ पंडित, बाळ पंडित, मनोहर साळवी, नंदकुमार पाटील, राजन देसाई आदी सभासदांचा गौरव करण्यात आला. संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन अरुण घाडीगावकर यांनी केले. कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, दिगंबर चव्हाण, प्रशांत भाटकर, सुनील कुवरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.