बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळता कामा नये - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळता कामा नये - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

      (वार्ताहर - विश्वास गायकवाड) बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीना जामीन मिळता कामा नये; पेण मधील चिमुरड्या मुलीवर बलात्कार करून तिची झालेली हत्या मानवतेला कलंक फासणारी घटना आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत असून या गुन्ह्यातील आरोपी हा या आधी बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला आरोपी असून तो जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याने मानवतेला काळिमा फासणारा बलात्कार आणि हत्येचा गुन्हा केला. त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीना जमीन मिळता कामा नये तसेच या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करावी या साठी गृहमंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले. 

       रायगड जिल्ह्याच्या पेण शहरातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या कोवळ्या चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची अमानुष घटना घडली. त्या मुलीच्या कुटुंबियांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. या बळीत मुलीच्या कुटुंबियांना ऍट्रोसिटी कायद्या च्या तरतुदीनुसार त्वरित ८ लाख २५ हजार रुपयांची मदत शासनाने द्यावी; मुलीच्या वडिलांना शासकीय नोकरी द्यावी तसेच या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर द्यावे असे निर्देश ना रामदास आठवले यांनी यावेळी प्रशासनाला दिले. बलात्कार गुन्ह्यातील पीडितेला मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत दिली जाते त्याची रक्कम राज्य शासनातर्फे अनेक प्रकरणांत दिली जात नसून त्याबाबत  गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. आदिवासी गावठाण भोवती संरक्षक भिंत बांधण्याची सूचना रामदास आठवले यांनी प्रशासनाला केली. 

      यावेळी रिपाइंचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड; हेमंत रणपिसे; नरेंद्र गायकवाड; धर्मानंद गायकवाड; घनश्याम चिरणकर आदी रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच तहसीलदार पोलीस अधिकारी उपस्थित होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week