
समाजसेवक प्रदीप गोहिल यांना झुंझार कोरोना योद्धा सन्मान !
समाजसेवक प्रदीप गोहिल यांना झुंझार कोरोना योद्धा सन्मान !
चिराबाजार येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गोहिल यांना दैनिक शिवनेर या वृत्तपत्राच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोहिल यांनी कोरोनाच्या काळात गिरगाव विभागात तसेच मुंबई मराठी पत्रकार संघात आणि अनेक सरकारी कार्यालयातील वास्तू आपल्या स्वखर्चाने सॅनिटायजरने निर्जंतुकीकरण केले होते. तसेच त्यांनी अनेक गरजू आणि गरीब हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना कोरोना काळात मोफत अन्नधान्य वाटप केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दैनिक शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांनी त्यांना हा पुरस्कार जाहीर केला. या पुरस्कार सोहळ्यात कोरोना काळात काम केलेल्या अनेक पत्रकारांना झुंजार पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
आम्ही नेहमीच समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करत असतो. या कोरोना काळात आमचा पत्रकार देखील न डगमगता आणि न घाबरता बातम्यांसाठी धडपडत होता. त्यातील अनेक पत्रकारांना कोरोनाची देखील लागण झाली होती. अशा या झुंजार पत्रकारांना सन्मान मिळावा आणि त्यांना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळावी या अनुषंगाने आम्ही हा झुंझार पत्रकार पुरस्कार सोहळा आयोजित केला असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी दिली. या समारंभात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. या सोहळ्यात आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार कृपाशंकर सिंह, माजी आमदार राज पुरोहित, माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे उपस्थित होते. या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालक ज्येष्ट पत्रकार आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी विष्णू सोनावणे यांनी केले.