नायजेरिया येथील चिमुरडीला रोटरी क्लबमुळे मिळाले जीवनदान !

नायजेरिया येथील चिमुरडीला रोटरी क्लबमुळे मिळाले जीवनदान !

      नायजेरिया येथील इमान्युएल या 1 वर्षाच्या चिमुरडीला हृदयात अनेक ब्लॉकेजेस होते. त्यामुळे तिची हृदयरोपण शस्त्रक्रिया करणे फार महत्वाचे होते.  शस्त्रक्रिया त्वरित करणे गरजेचे होते आणखी काही दिवस शस्त्रक्रिया करण्यास विलंब झाला असता. तर कदाचीत या चिमुरडीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.  नायजेरिया येथील ह्या चिमुरडीचे कुटुंब फार गरीब असून तेथे हि शस्त्रक्रिया होणे केवळ अशक्यच होते. त्यामुळे तिची आई आणि चिमुरडीने मुंबई येथे येऊन रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र अगरवाल यांच्या माध्यमातून हाजीअली येथील  एसआरसीसी या लहान मुलांच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया केली. हि शस्त्रक्रिया यशस्वीरित्या  पार पडली असून आता हि चिमुरडी हसत आणि खेळत आहे.

      माझ्या मुलीच्या हृदयात ब्लॉकेजेस आहे हे कळल्यावर मला  धक्काच बसला. आमचा नायजेरिया हा देश अत्यंत गरीब असून तेथे हि शस्त्रक्रिया होऊच शकली नसती. तसेच आमची आर्थिक परिस्थिती गरीब असल्या कारणाने आम्हाला देखील हि शस्त्रक्रिया परवडणारी नव्हती. याबाबत आम्ही नायजेरिया येथील रोटरी क्लब यांच्याशी मदतीसाठी संपर्क साधला असता त्यांनी रोटरी क्लब जागतिक संघटनेचे अध्यक्ष शेखर मेहता यांच्याशी समन्वय साधून मुंबई येथील रोटरीचे डिस्ट्रीकट गव्हर्नर राजेंद्र अगरवाल यांच्याकडे माझ्या मुलीच्या शस्त्रक्रियेबाबत चर्चा केली आणि त्यांनी तात्काळ आम्हाला मदत करण्याचे आश्वासन देऊन आम्हाला मुंबई, हाजीअली  येथील एसआरसीसी रुग्णालयात बोलवून माझ्या मुलीची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल मी रोटरी क्लबचे राजेंद्र अगरवाल आणि शेखर मेहता यांचे मनापासून आभार मानते अशी माहिती  इमान्युएलच्या आईने दिली. 

       या लहान मुलीची हृदय शस्त्रक्रिया करण्याबाबत मला आमच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून मला माहिती मिळाली. परंतु हि लहान मुलगी नायजेरिया येथील असल्याबाबत मला आश्चर्याचा धक्काच बसला. या लहान मुलीला मदत करावी यासाठी मी खूप मेहनत घेतली आणि शेवटी माझी हि मेहनत यशस्वी झाली. या मुलीची हृदयाची शस्त्रक्रिया नुकतीच हाजीअली येथील एसआरसीसी रुग्णालयात डॉ. बाळकृष्ण इनामदर यांनी यशस्वीरीत्या केली असून आता हि चिमुरडी आनंदाने खेळत आहे. याबाबत मी रोटरीच्या सर्व टीमचे आणि या मुलीला मदत करणाऱ्या सहकार्याचे मनापासून आभार मानतो अशी माहिती रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र अगरवाल यांनी दिली. या चिमुरडीला भेटवस्तू देण्यासाठी डॉ. राजेंद्र अगरवाल, लीना शाह आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week