
सारस्वत परिचय पुस्तकाचे प्रकाशन !
इतिहास लिहिण्यासारखे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल सारस्वत प्रकाशनची टीम कौतुकास पात्र !
डॉ. प्रेमानंद रामाणी
इतिहास लिहिणे किंवा इतिहासावर लिहिणे अत्यंत कठीण असते. 'सारस्वत परिचय' हे पुस्तक इतिहास लिहिल्यासारखेच आहे. असे पुस्तक लिहिणे सोपे नाही. हे काम सारस्वत प्रकाशनच्या टीमने केल्याबद्दल ते खरोखरच कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मज्जासंस्थेसंबंधीचे निष्णात डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी काढले.
ते सारस्वत प्रकाशनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या 'सारस्वत परिचय' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, "मुसलमान त्यांच्या प्रार्थनेच्या वेळा चुकवीत नाहीत. "ख्रिश्चन त्यांच्या प्रार्थनेच्या वेळा चुकवीत नाहीत. या धर्मियांचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक ठरलेल्या वेळेला प्रार्थना करतातच. मग अशी शिस्त हिंदूना का नाही? माझ्या मते सर्व हिंदूंसाठी व विशेषतः सारस्वतांसाठी एक 'कॉमन' देवाची प्रार्थना हवी व ती प्रत्येक सारस्वतांनी म्हणावयास हवी. अशी सर्वांसाठी योग्य प्रार्थना तयार करण्यासाठी या विषयातील तज्ज्ञांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ७५ पुस्तके लिहिलेल्या डॉक्टर रामाणी यांनी पुढे सांगितले की बहुतेकजण सकाळी आंघोळ झाल्यावर देवापुढे दिवा लावतात. हा दिवा लावणे म्हणजे देवाला सांगणे असते की, हे देवा आम्हाला आजच्या दिवसासाठी प्रकाशाचा म्हणजे चांगला मार्ग दाखव व हा दिवा लावून झाल्यावर प्रत्येक सारस्वतांनी एक 'कॉमन' प्रार्थना देवापुढे म्हणावयास हवी व प्रत्येकाने देवापुढे दिवा लावावयासच हवा.
सारस्वत प्रकाशनतर्फे सारस्वत ज्ञातीतील लोकांसाठी 'सारस्वत चैतन्य' हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. या संस्थेने अलीकडेच मुंबईतील माहीम येथील तेंडुलकर मंगल कार्यालय येथे 'सारस्वत परिचय' या पुस्तकाचे प्रकाशन केले. प्रमोद तेंडुलकर व सुधाकर लोटलीकर हे या पुस्तकाचे संपादक आहेत. या पुस्तकात सारस्वतांची आडनावे, गोत्र, त्यांचा ज्ञातिघटक (उपजात) त्यांचे कुलदैवत व कुलदैवतांचे स्थान याविषयी २००० हून अधिक आडनावांची सूची तसेच गोत्र, प्रवर व सारस्वतांची कुलदैवते व मठांविषयीही संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे.
या पुस्तकाचे विमोचन डॉ. प्रेमानंद रामाणी, कालनिर्णयकार व आर्थिक क्षेत्रातील जाणकार श्री. जयराज साळगावकर व मुळचे शिक्षकी पेशातील व सारस्वत बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. किशोर रांगणेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदयात्री कवी प्रसाद कुलकर्णी यांनी शैलीदार संवादाने केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर प्रसाद कुलकर्णी यांनी तिन्ही मान्यवरांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर या तिन्ही मान्यवरांशिवाय सारस्वत प्रकाशन संस्थेचे विश्वस्त व 'सारस्वत चैतन्य'चे संपादक प्रमोद तेंडुलकर व सारस्वत प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप भिसे उपस्थित होते. त्यानंतर सारस्वत परिचय पुस्तकाचे एक संपादक प्रमोद तेंडुलकर यांनी संपादक या नात्याने नवीन पुस्तकाच्या निर्मितीची कथा सर्व अंगांनी मांडली. संकल्पना ते प्रकाशन यापर्यंतच्या झालेल्या या पुस्तकाचा प्रवास त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. तसेच या पुस्तकाचे दुसरे सहकारी संपादक सुधाकर लोटलीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळेच अनुपस्थित आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी राज्यसभेचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी अतिशय मार्मिक संदेश पाठवला होता त्याचे वाचन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
श्री. जयराज साळगावकर यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला पुस्तकाच्या तांत्रिक बाबींचा गौरव केला. ते स्वतः प्रकाशन व्यवसायात असल्यामुळे त्यांनी या पुस्तकातील फोटो सुंदर असून 'लेआउट' ही उत्कृष्ट आहे असे अधिकार वाणीने सांगितले. ते पुढे म्हणाले की, रानटी पोर्तुगीजांनी गोव्यात सारस्वतांचा जो छळ केला त्याच्या जखमा अजून ओल्या असल्यामुळे सारस्वतांच्या व्हाट्सअप ग्रुपवर वरचेवर त्यांच्या कुलदैवतांची इमेजिस दिसतात. ते पुढे म्हणाले की, भारतात इतिहासकार बरेच पण सर्वाधिक इतिहासकार गोव्याने भारताला दिले. सारस्वत सर्वच क्षेत्रात आहेत आणि सर्वच क्षेत्रात शिखरावर असलेले सारस्वत आहेत असे सांगून त्यांनी सारस्वतांचा गौरव केला. मासे खाणे ही सारस्वतांची अस्मिता आहे. मंदिरे, मठ व स्वामी हे त्यांचे सर्वस्व आहे अशी सारस्वतांची ओळख त्यांनी करून दिली. या सर्वांची आडनावे, उपजात, गोत्र, कुलदैवते इत्यादींचा धांडोळा घेणे आवश्यक होते. ते फार मोठे काम या पुस्तकाने केले आहे याबद्दल संपादक व सारस्वत प्रकाशनचे पदाधिकारी खरोखरच कौतुकास पात्र आहेत, अशी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन साळगावकर यांनी आपले भाषण संपवले.
श्री. किशोर रांगणेकर आपल्या भाषणात म्हणाले की ज्या हातांनी व बोटांनी लाखो रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या त्याच हातांनी आज या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. सारस्वत प्रकाशन ही संस्था सारस्वतांच्या सर्व पोटजातीतील लोकांना एकत्र घेऊन काम करत आहे. इतर सारस्वतांच्या ज्या संस्था सर्व पोटजातीतील लोकांना एकत्र घेऊन काम करतात त्या संस्थांचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, सारस्वतात एकजूट हवी असेल तर सर्व पोटजाती मनाने, विचाराने एकत्र हव्यात. सारस्वतांच्या मुंबईसह भारतभर शंभरहून अधिक संस्था आहेत पण प्रत्येक संस्थेचे स्वतंत्र साम्राज्य आहे. या सर्व संस्थांना एकत्र जोडण्यासाठी या संस्थांचे फेडरेशन होणे गरजेचे आहे. सारस्वतांच्या बँकांचे अध्यक्ष, ज्ञातीतील विचारवंत, अनुभवी वरिष्ठ नागरिक व सारस्वतांच्या संस्थांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन फेडरेशनची स्थापना करून शिखर परिषदेचे आयोजन करावे अशी सूचनाही त्यांनी आपल्या भाषणात केली. रांगणेकरांनी या पुस्तक विमोचनाच्या प्रसंगासाठी एक कविता केली होती तीही त्यांनी उपस्थितांना ऐकवली.
संस्थेचे अध्यक्ष दिलीप भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
सारस्वत प्रकाशनच्या या छोटेखानी समारंभाचे आयोजन फार चांगले होते. या समारंभास ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष अनुक्रमे अजित गुंजीकर व किशोर मासुरकर, सारस्वत चेंबरचे संचालक सिध्दार्थ सिनकर, तसेच सारस्वतांच्या अनेक संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोनासंबंधीचे सर्व नियमांचे पालन करून उपस्थितांच्या सुरक्षेची पूर्ण. काळजी घेण्यात आली होती. हॉलबाहेर सॅनि- टायझर तापमापन, मुखपट्ट्या इ. उपलब्ध होते. खुर्च्यात नियमाप्रमाणे योग्य अंतर ठेवण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यावर उपस्थितांसाठी अल्पोपहार व चहा-काॅफीचीही सोय करण्यात आली होती. बऱ्याच महिन्यांनंतर या कार्यक्रमामुळे सारस्वत एकमेकांना भेटले म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.