त्यांना व्यंग्य कळलेच नाही !!
खरं तर "सामना" मधील तो कालचा "वाईन डाईन आणि फाईन - व्वा राजबाबू" हा अग्रलेख नर्म विनोदी, साहित्यिक कलाकुसरीने भरलेला छान लेख आहे. त्यातील "फाईन" या शब्दात श्लेष आहे. एक आहे, "मस्त" हा अर्थ असलेला तर दुसरा आहे अपराधाबद्दल शासन देणारा "दंड". लेखकाने "दारुची दुकाने खुली करा," या मागणीमागील दोन्ही बाजुच्या परिणामांच़ं हसत खेळत छान विश्लेषण केले आहे. हरिवंशराय बच्चन यांच्या "मधुशाला" आणि इतर उर्दू शायरी चे संदर्भ या लेखाला एक उंची मिळवून देतात. "अगर दम है तेरी इबादत में तो मस्जिद हिलाके दिखाना| वरना यहाँ आकर दो घुंट पिले मस्जिद हिलती दिखेगी||"
मदिरा प्राशनाच्या गंभीर परिणामांचे खोल वर्णन यात अंतर्भूत आहे. दारू पिणारा माणूस आपला धर्मबिर्म धुडकावून माणुसकी हरवून बसतो हेच त्या शायराला सुचवायचं आहे. त्याचबरोबर महसूल वाढीच्या आशेनं दारुची दुकाने खुली केल्यास करोनारोगाचा तीव्र प्रसार कसा आणि किती गंभीर प्रमाणात होईल हे देखील या लेखात सांगण्यात आले आहे. राज साहेब हे स्वत: कलावंत आहेत, कला रसिक आहेत, व्यंगचित्रकार आहेत. त्यामुळे आपण केलेल्या मागणीवर कशा तिखट प्रतिक्रिया उमटतील याची राजसाहेबांना जाणीव नसेल असं समजणं दूधखुळेपणा आहे. त्यांनी तळीरामांच्या "दारुची दुकाने खुली करा" या मागणीतील व्यंग्य ओळखून ती व्यंगात्मक प्रतिक्रिया व्यक्त करून मद्यरसिक आणि अरसिकांमध्ये एकच धमाल उडवून दिली. त्यामुळे संजय राऊत साहेबांनीही हे व्यंग्य अचूक ओळखून आपले नेहमीचे हृदय विदिर्ण करणारे हातोड्याचे घाव "घणाघात," बाजुला ठेवून हे व्यंग्यात्मक लेखन केले. मजा आली. परंतु राजसाहेब आणि संजय राऊत साहेब यांच्या किरकिऱ्या, किटकिट्या, किरट्या अरसिक राजकीय विरोधकांना हे व्यंग्य समजलेच नाही. हा त्यांचा उथळपणा आहे, पोरकटपणा आहे. त्यामुळेच या मागणीसंदर्भात ते राजसाहेब आणि संजय राऊत साहेब यांच्यासभोवती उगाचच गुं गुं करीत भूनभून करीत आहेत.