
जगाला दिशा देण्याची क्षमता महाराष्ट्राकडेच !
१४ एप्रिलच्या रात्री ०८-०० वाजता कोरोनाव्हायरस विरोधातील लढ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी टिव्हीवर जे म्हणाले ते ऐकून अशक्तांच्याही शरीरात गरमागरम उर्जेची जोरदार लाट उसळली असेल. आपल्या सैन्यात वीरश्री निर्माण करणाऱ्या लढवय्या शूर सेनापतीला शोभेल असे भाषण होते ते. हा सेनानी श्रोत्यांच्या हृदयात शिरून त्यांच्याशी संवाद साधत होता. टिव्हीवरील त्यांचं ते वक्तव्य संपताच टाळ्या वाजवून दाद देण्याचा मोह आवरला नाही ... *महाराष्ट्रच जगाला दिशा दाखवण्याचं काम करील* हा त्यांच्या मुखातून निघालेला आत्मविश्वासपूर्ण उद्गार हा या संवादातील परमोच्च बिंदू होता.
मुख्यमंत्र्यांनी जनतेशी साधलेल्या या संवादाचा संदर्भ सकाळी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून जनतेशी साधलेल्या संवादाशी होता. उद्धवजींनी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन आधीच जाहीर केला होता. पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरासाठी तो ३ मेपर्यंत जाहीर केला. आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी त्या त्या परिसरातील कोरोना विषाणू संसर्गाची कमी तीव्रता अभ्यासून त्यानुसार तेथै लाॅकडाऊन टप्प्या टप्प्याने शिथिल केला जाईल असेही जाहीर केले. याबाबतही पंतप्रधानांना धन्यवाद दिले पाहिजेत. त्यातही, "लाॅकडाऊनमुळे देशावर आर्थिक संकट कोसळलेले असून त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान प्रचंड आहे. परंतु आर्थिक हानी कितीही मोठी असली तरी लोकांच्या जीवाशी तिची तुलना होऊ शकत नाही. म्हणून लोकांचे जीव कोणत्याही परिस्थितीत आधी जपले पाहिजेत" अशा आशयाचे पंतप्रधानांचे उद्गगार मनास स्पर्शून गेले. खरं तर पंतप्रधान जनतेच्या मनातलेच विचार उद्गगारले आहेत असं वाटलं. कितीही मोठे आर्थिक नुकसान झाले तरी जनतेच्या प्राणांसमोर त्याची किंमत शून्यच. "सर सलामत तो पगडी पचास!" आर्थिक घडी काय, आधीपासूनच प्राप्त असलेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुढील दोन तीन वर्षांत निट बसविता येईल, परंतु गेलेले प्रयाण पुन्हा परत आणता येत नाहीत.
"कोरोनाविषाणूच्या विरोधात केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांशी उत्तमरितीने समन्वय साधून आम्ही सर्व एकदिलाने लढत आहोत" असं उद्धवजी म्हणाले.
परंतु त्याचवेळी काही आगीचे बंब आग लावण्याचे राजकारण करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असंही उद्धवजी म्हणाले. ते असं कुणाला उद्देशून म्हणाले हे ठाऊक नाही. परंतु ते जे कोणी आगलावे आहेत ते अशा भीषण प्रसंगी जनतेच्या जीवाशी खेळत आहेत असंच वाटतं. ही वेळ राजकारण करण्याची नसून परस्परांतील मतभेद विसर्जनाची कोरोणाविषाणू विरोधात एकजुटीने लढण्याची आहे. राष्ट्रीय संकट कोसळताच सर्वांनी शत्रू विरोधात एकदिलाने लढण्याची या भरतभूमीची आतापर्यंतची परंपरा आहे. मग याच वेळी हे दुहिचे राजकारण कशाला? समस्त जनतेच्या प्राणांवर, तिच्या अस्तित्वावरच घाला घालणाऱ्या या मानव निर्मित विषाणूचे, या परजीवी एलियनचे समूळ उच्चाटन करण्यासाठी असंख्य डाॅक्टर्स, तज्ज्ञ, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलिस, अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी, बॅंक कर्मचारी, पोलिस, पत्रकार, सरकार, सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि समस्त जनता अहोरात्र लढत असताना मध्येच केवळ स्वार्थांध होऊन हा लढा खंडित करण्याचे, नरसिंह तानाजी मालुसरेंचा बळी घेण्यासाठी तडफडणाऱ्या दुष्ट, कपटी उदयभानाप्रमाणे विश्वासघातकी कारस्थाने रचणाऱ्यांची मानसिकता किती लांडग्यांच्या वृत्तीची आहे हे यावरून लक्षात येते. कोरोनाविषाणूग्रस्त मढ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच हा घृणास्पद प्रकार आहे.
कोरानाविषाणूच्या संकटाने जगभरात सर्वत्र हैदोस घातला असताना त्या देशांच्या तुलनेत आपल्या देशावर ओढवलेल्या या संकटाची तीव्रता कमी राखण्याचे श्रेय आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे. परंतु महाराष्ट्रातील हे संकट सीमित ठेवण्याचे महत्कार्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेही आहे. या अशा भयावह संकट प्रसंगी उद्धवजींसारखा सुसंस्कृत, सुशील, सुशिक्षित, बुद्धिमान, निगर्वी, प्रेमळ, कनवाळू, दूरदृष्टी व प्रचंड आत्मविश्वास असलेला, खंबीरपणे आपले निर्णय राबवणारा नेता लाभला हे महाराष्ट्राचे भाग्यच.
परंतु केवळ आपला नेता थोर आहे, महान आहे, शूर आहे, सद्गुणी आहे म्हणून तो करोनाविषाणूचा एकटाच
नाश करू शकेल या भ्रमात वावरणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की आपली स्वत:ची तर आपण स्वर्गात जाण्याची तयारी करत आहोतच, पण त्याचबरोबर आपले जीवाभावाचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, शेजारीपाजारी आणि एकुणच सर्व समाजास आपण स्वर्गाच्याच वाटेवर नेत आहोत. कारण हा कोरोनाविषाणू नातीगोती, जातपात, धर्मबिर्म, स्त्री-पुरुष, लहानमोठा, श्रीमंतगरीब, सुरूपकुरूप, काळागोरा, उंचठेंगणा असा कसलाही भेद जाणत नाही. हे विषाणू श्वापद त्याच्या संपर्कात येणाऱ्या कोणत्याही माणसास ग्रस्त करून त्याला १०-१५ दिवस शिजवून फस्त करते.
याची विघातक क्षमता अतिअतिप्रचंड आहे, एका अणूबॉंबहूनही कित्येक पटींनी अधिक आहे. आज या विषाणूने जगात सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेल्या दोन अणूबॉंबस्फोटांनी ती शहरे नामशेष झाली. परंतु कोरोनाविषाणूंनी ग्रस्त झाल्यामुळे अमेरिका, इटली, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, द. कोरिया,चीन अशा अनेक मातब्बर देशांबरोबरच इतरही १०० हून अधिक देशात प्रचंड अर्थ आणि जीवितहानी घडून आली आहे. जे १५० अणूबॉंबस्फोटांनी नुकसान झाले नसते ते केवळ एका कोरोनाविषाणूच्या प्रसारामुळे घडले आहे. उपरोक्त आकडे आपणास कदाचित अतिशयोक्त वाटतील, परंतु आपण सरकारच्या कोरोनाविषाणूविषयक आदेशांचे पालन न केल्यास आपल्या संदर्भात काय भयंकर घडू शकेल याची पुसटशी कल्पना यावी.
या लेखाचा मूळ उद्देशच हा आहे की आपणावर कोसळलेल्या आपत्तीची भीषणता माझ्यापरीने लोकांच्या लक्षात आणून देणं. याला कारणही तसंच आहे. संपूर्ण भारतात महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईतील प्रमाण सर्वात जास्त आहे. कोरोनाविषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा दरही भीतीदायक वाटावा इतका जास्त आहे. अशा चिंताजनक परिस्थिती निर्माणास कारणेही तशीच आहे. मुख्य कारण म्हणजे हे शहर जगातील प्रमुख औद्योगिक शहरांपैकी एक आहे. भारताचे हे मुख्य प्रवेशद्वारच आहे असे समजण्यास हरकत नाही. कारण भारतात येणाऱ्या एकुण प्रवाशांपैकी सुमारे ९०% प्रवाशांना प्रथम मुंबईत प्रवेश करूनच नंतर पुढे इच्छित स्थळी जाता येते. इथं मुंबईत जगाच्या सर्व दिशांमधून असंख्य लोक विमानप्रवासाच्या माध्यमातून रोजच गर्दी करत असतात. २०१९ या वर्षात एकुण पाच कोटी परदेशी व्यक्तींनी या शहरात प्रवेश केला. फेब्रुवारी-मार्चमध्ये सुमारे १५ लाख व्यक्तींनी मुंबईत प्रवेश केला. यांच्यापैकी काही लाख लोक कोरोनाग्रस्त देशातून आले. त्यांच्याकडूनच हा विषाणू मुंबईत व अन्यत्र पसरला. दुसरे कारण मुंबईची दाट लोकवस्ती. ही दाटी इतकी आहे की दुर्दैवाने घरात एक रुग्ण जरी सापडला तरी त्याचा संसर्ग त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनाच होणे अपरिहार्य ठरते. रुग्ण संख्या गुणाकारात वाढत असल्यामुळे एका संसर्गिताकडून सुमारे १०० व्यक्तिंना ही लागण होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातो. तिसरे कारण लोकांचे आरोग्यविषयक घोर अज्ञान. चौथे कारण आहे लोकांची सामाजिक बांधिलकीविषयी अनास्था. लोक जागोजागीच्या मार्केटांत सोशल डिस्टंसिंगचं बंधन जुगारून बाजारात झुंडिने गर्दी करीत असतात. जणू काही आता वस्तू खरेदी केली नाही तर पुढे उपाशी मरावे लागेल या भीतीयुक्त भावनेनं सैरभैर होऊन धावत सुटतात. समाजात अशी स्थिती निर्माण करण्यास मुख्यत: बेजबाबदार व्यक्तिंनी पसरवलेल्या अफवांचे पिक कारणीभूत असते. पाचवे कारण आहे जवानीच्या जोशाने भारलेला, स्वत:ची नको तिथं मर्दुमकी दाखविण्यासाठी आसुसलेला बेजबाबदार तरुण वर्ग. हा तरुण वर्ग केवळ थ्रील म्हणून संचारबंदीचा आदेश धाब्यावर बसवत असतो. कधी कधी हा तरुण रात्रंदिवस कायदा आणि सुव्यस्थेच्या रक्षणात व्यग्र असणाऱ्या पोलिसांवरही हात उगारण्यास कमी करीत नाही. आणि सहावे कारण आहे समाजाची दैववादी वृत्ती. ही दैववादी वृत्तीच सर्वांचा सर्वत्र घात करीत आहे. तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी प्रचंड अनास्था. तुम्ही पन्नास वेळा हात धुवा, पण कोरानाने ग्रासणे दैवात असेल तर आपल्याला कुणीही वाचवू शकत नाही आणि दैवात नसेल तर काहीही केलं तरी आपणास रोग लागू शकतं नाही, अशीही ठाम मनोधारणाच या जनतेचा घात करीत आहे. याच वृत्तीमुळेच लोक आरोग्यविषयक नियमांची किंवा सरकारी आदेशांचीही बुज न ठेवता दोन व्यक्तिंमधील सुरक्षित अंतराची फिकीर बाळगत नाहीत, तोंडावर मास्क बांधत नाहीत, नाकातोंडात बोटं घालणं थांबवत नाहीत. परंतु अशा प्रकारची वृत्ती सर्वांनाच घातक आहे, दैववाद्यांना, तसेच विज्ञानवाद्यांनाही. कारण दोन्ही घटक एकाच समाजाचा भाग आहेत. मुंबईत इमारती, चाळीं इतक्या एकमेकांस इतक्या खेटून उभ्या आहेत की एका इमारतीस आग लागली तर बाजुच्या इमारतीही कापरा सारख्या भुरुभुरु जळून अख्खी वस्ती खाक होऊ शकते. तसं होऊ नये म्हणूनच एका इमारतीस आग लागल्यास ती बाजुच्या इमारतींमध्ये पसरू नये याची काळजी अग्निशमन दलाचे जवान प्रथम घेतात. तसंच या कोरोनाविषाणूचं आहे. हा एका व्यक्तीला चिकटला की आगीच्या वेगानं सर्वांना ग्रासू लागतो. तसे होऊ नये म्हणूनच सरकारने ३ मे पर्य़त लॉगडाऊन जाहीर केला आहे त्याचे कसोशीने पालन करीत सोशल डिस्टंसिंग व अन्य आरोग्यविषयक नियमांचा आदर करणे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे.
कोरोना हा जगाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात विघातक विषाणू आहे हे जरी खरे असले तरी त्याला घाबरून बिथरुन जाण्याचे कारण नाही. आजपर्यंत प्लेग, पटकी, हिंवताप, देवी, विषमज्वर असे अनेक विषाणू आले नि गेले. त्या त्या वेळेला तो जगातला सर्वात भयंकर विघातक विषाणू ठरत होता. परंतु माणसाने आपल्या वैज्ञानिक बुद्धिमत्तेच्या बळावर या सर्व विषाणूंचा नि:पात केला आहे. वैज्ञानिक या कोरोनाचाही लवकरच विनाश घडवून आणतील यात शंकाच नाही. परंतु ती वेळ येईपर्यंत आपले कमीत कमी नुकसान होईल याची आपण आपली काळजी घेतली पाहिजे. अखेरीस विजय १०० टक्के आपलाच आहे. मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे ही लढाई ते १०० टक्के जिंकून आपल्या जनतेला वाचवतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तोपर्यंत आपण धीर धरून त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे योग्यरितीने पालन करण्याची गरज आहे.