कोरोनाचा विनाश होणारच !

कोरोनाचा विनाश होणारच !

     अखेरीस माणसासारखा माणूसच, तो हरणारा नाही. एक कोरोना विषाणू त्याला हरवू शकत नाही. कधीकाळी प्लेग, पटकी, देवी असे रोग गावेच्या गावे निर्मनुष्य उजाड करीत असत. त्या शत्रूंची गच्छन्ती झाली. क्षयरोग नियंत्रणात आणला. विषमज्वर, हिंवताप अशा अनेक रोगांना काबूत आणले. पोलीओस ऑलआऊट केले. भयकारी एड्स, कर्करोगास वेसण घातली... हे सगळे एका रात्रीत घडलेले नाही. या रोगा़ंच्या विरोधात वर्षानुवर्षे लढा द्यावा लागला. या लढ्या दरम्यान अगणित मनुष्यबळ खर्ची पडले, परंतु अखेरीस मनुष्यच विजयी झाला. मानवाच्या जबरदस्त इच्छा शक्तीस तोडच नाही. उद्या करोनासही माणूस नक्कीच हद्दपार करील. आज ह्या करोनानं टोटल जग व्यापलंय. सर्व जग आपल्या कराल दाढेत तो ढकलत असल्याचं भीषण चित्र आज दिसत आहे. अख्खंजग भीतीनं थरथरत आहे. 

        मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मिनिटागणिक वाढत आहे. परंतु हे अपरिहार्य आहे. युद्धात प्राणहानी झाली नाही तर ते युद्ध कसले!

          हा कोरोना महाकाय जगत्व्यापी असल्याचा जो भास होतोय तो त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील फरकामुळे. पूर्वी खेडीच्या खेडी महामारीने ओसाड पडत असत. आजही तेच घडत आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे आज जगच खेडे बनले आहे. त्यामुळे करोनाची व्याप्ती खूप मोठी भासत आहे. परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही. ज्या  घरातले जीव या लढाईत कामी येत आहेत ती घरे दु:खात बुडत आहेत. परंतु त्यांचेच मृत्यू या कोरोनाच्या मरणास कारणीभूत ठरणार आहेत... थोडा धीर धरावा लागेल, कोरोनाचा नि:पात निश्र्चित आहे... फक्त विज्ञान नावाचा देवच ह्याची इतिश्री घडवून  आणणार आहे, मानवतेच्या इतिहासात तो दिवस सुवर्णाक्षरांत लिहिला जाणार आहे. त्यासाठी आपणास तज्ज्ञ डाॅक्टर आणि  सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालायचे आहे एवढंच.


Batmikar
जेष्ठ पत्रकार - अशोक सावंत

Most Popular News of this Week