वसंत दादा आणि हरवलेले सभासद !

वसंत दादा आणि हरवलेले सभासद !

    दादा असेही... दादांना तळागाळातील लोकांबद्दल कणव होती, प्रेम होतं,,,,

       बहुधा १९७७ साल असावं. आमचे ते महाविद्यालयीन दिवस होते. आम्हा काही हौशी तरुणांची *हिप्सी फ्रेंड्स* नावाची एक समाजसेवी सामाजिक संस्था होती. या संस्थेच्या मार्फत आम्ही एकांकिका़ही विविध स्पर्धां मध्ये सादर करीत असू. आम्ही गिरणी कामगारांची मुलं. त्यामुळे ही हौसही परवडण्यासारखी नव्हती. कसेबसे स्पर्धांमध्ये एकांकिका प्रयोग करीत होतो. परंतु आम्हाला काही भव्यदिव्य भरीव करायचे होते. त्यासाठी बऱ्यापैकी पैशाची गरज होती. मग आमच्यापैकीच कुणाच्या तरी डोक्यातून कल्पना निघाली की आपण तिकीट लावून आपल्या एकांकीका कराव्यात. आपल्या दोन एकांकिका आणि एक त्यावर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत गाजलेलं आणि पहिल्या नंबरवर आलेलं फार्सिकल नाटक करायचं. फार्सिकल नाटकाला भरभक्कम बिदागी द्यावी लागणार होती. परंतु थिएटर मिळणं तेही रविवारी किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आवश्यक होतं. शिवाजी मंदिरवाल्यांनी "आम्ही फक्त व्यावसायिक संस्थांना शनिवार-रविवारच्या  किंवा सार्वजनिक सुट्टीच्या तारखा देतो,"असं सांगून हुसकावून लावलं. त्यांचे भाडेही न परवडणारे अफाट होते.

        त्यानंतर आमचा मोर्चा आम्ही रविंद्र नाट्यमंदिराकडे वळवला. तिथं ही तेच रडगाणं. त्यातही तीन महिने अगोदर बुकींग करण्याची गरज. सरकारी असल्याने भाडे परवडणारे होते. परंतु रविवार किंवा अन्य सार्वजनिक सुट्टीची तारीख मिळणं अशक्य होतं. आम्ही निराश होऊन आमचा तो उपक्रम आम्ही रद्द केला. परंतु ०८-१० दिवसांनी पुन्हा कुणी तरी आपली अडचण दूर होऊ शकते, परंतु त्यासाठी मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलांपर्यंत आपलं गाऱ्हाणं पोहोचण्याची गरज आहे असं सुचवलं. आमच्यापैकी काहीजण दादासाहेबांपर्यंत पोहोचलेही. त्यांनी आपल्या पी. ए. ला याबद्दल सुचना केली आणि पीए कडून तीन महिन्यां नंतरची रविवारची तारीख मिळाल्याचं कळलंही. आम्हाला इतका आनंद झाला या गोष्टीचा... आपण रवींद्र नाट्यमंदिराच्या रंगमंचावर नाटक करणार ही कल्पनाच खूप थरारक वाटली. आम्ही आमची तिकीटं जोषात खपवण्याचे प्रयत्न करू लागलो. जसजशी तारीख जवळ येत गेली तसं तसा आमच्या तालमीचा आणि तिकिटं खपवण्याचा हुरूप वाढत चालला. आता प्रयोगाला केवळ पंधरा दिवस उरले होते.

         आणि हाय रे दुर्दैवा, तेव्हाच सरका उसरी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आणि तो पुढे ४० दिवस टिकला... आमच्या नाट्यप्रयोगाचा आणि आमच्या स्वप्नांचा बोजवारा उडाला. त्या दिवसापासून ती संस्था कर्जात बुडाली ती बुडालीच. जे पुढे पुढे नाचत होते त्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं चढलं. संस्थेतील जवळ जवळ सर्वच सभासद या दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले ते अद्यापही सापडलेले नाहीत....

       (अशोक सावंत)


Batmikar
जेष्ठ पत्रकार - अशोक सावंत

Most Popular News of this Week