
अन्यायाविरुध्दची लढाई संपलीच नाही !!
"बळी तो कान पिळी" या म्हणीनुसार सामान्य जनतेचे रहाटगाडगे चालवले जाते. समाज, प्रशासन व्यवस्था, सरकार, न्यायालये सर्व काही बधीर संवेदनाहीन झालेले. त्यांना वठणीवर आणणारे आज कुणी शिल्लकच नाही. जुने राजे महाराजे संपले आणि त्यांच्या जागी खासदार, आमदार, नगरसेवक इत्यादी स्वरुपातील नवे राजे महाराजे जन्माला आले. अन्यायाविरुद्धची लढाई संपलीच नाही. सामान्य माणसाच्या जीवनमरणाशी यांना काहीच देणे घेणे नाही. त्यामुळे ऐरोलीत एक ११ वर्षीय गरीब मुलगा दुकानासमोरच्या शिडीत विद्युत प्रवाह उतरल्याचा स्पर्श होऊन जळून मरण पावला त्याचे त्यांना कसले आलेय सोयरसुतक! बांधकाम क्षेत्रातील मजुर उंचावरून पडून मरण पावतात, देश चंद्रावर जाण्याच्या तयारीत असला तरी सामान्य मजुरांना बंदिस्त सांडपाण्याच्या टाकीत उतरवण्याची अमानुष पद्धत बंद होत नाही, त्यांचे टाकीतील विषारी वायूने मरणे टळत नाही, "बलात्काऱ्याला शिक्षा न सुनावता उलट त्या बलात्कारीतेशी तू लग्न करण्यास तयार आहेस काय?" असा मुलींच्या मातापित्यांच्या अंगावर भीतीने शहारे आणणारा प्रश्न विचारला जातो, सलमान खान सारख्या मद्यधुंद सेलिब्रिटींच्या चाकाखाली झोपलेल्या अवस्थेत बेघरांचे चिरडून मरणे चुकत नाही, गावात मुजोर खाण मालकांनी खोदून तयार केलेल्या खोल तलावात मुले-गुरे बुडून मरतात याच्याशी यांचे देणेघेणे नाही.
मात्र सेलिब्रिटींपैकी एखाद्या पूजा चव्हाण किंवा सुशांत सिंहने आत्महत्या केली की मात्र यांना कंठ फुटून हे प्रशासन, सरकार, न्यायव्यवस्था याविरुद्ध आरोळ्या ठोकून बेटकुळ्या फुगवून दाखवू लागतात. सगळे काही स्वतःच्या मतलबासाठी. या देशात ही असली तमासगीरी बंद होऊन सामान्य जनतेच्या सुखदुःखाशी बांधिलकी असलेली खरीखुरी लोकशाही कधी अवतरणार आहे कोण जाणे !