
वाचन प्रेरणा दिनानिमित्त !!
आज १५ ऑक्टोबर, प्रगत सुजलाम सुफलाम नवभारताचे स्वप्न रेखाटणारे थोर विचारवंत विद्वान पुरुष माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. एक.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, त्यांच्या स्मृत्यर्थ साजरा केला जाणारा *वाचन प्रेरणा दिन*
डॉक्टर कलाम यांनी आपल्या वैयक्तिक जीवनात संन्यस्त वृत्तीचा स्वीकार करून जीवनभर केवळ आणि केवळ भारतीय जनतेच्या कल्याणाचाच विचार केला. आपला देश समृद्ध व्हावा यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने सकारात्मक विचार आणि कृती केली पाहिजे असे त्यांना वाटे मुले, विद्यार्थ्यांवर त्यांचे अपार प्रेम होते. ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्येच रमत असत. त्यामुळेच त्यांनी शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी एकूण २४ पुस्तके लिहिली. देश शाळेतील वर्गात घडत असतो असा त्यांचा सिद्धांत होता. विद्यार्थ्यांनी वाचन केले तरच त्यांच्यातून आधुनिक वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, संशोधक, गणितज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, वकील, नि:पक्ष न्यायाधीश, कवी, लेखक, प्राध्यापक, इतिहासकार, विचारवंत, नेते, अभिनेते, संगीतकार, गीतकार, गायक, कलावंत, खेळाडू, शिक्षक असे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ निर्माण होतील. म्हणूनच आजच्या दिवशी प्रत्येकाने डॉक्टर कलामांचे किंवा अन्य कोणत्याही वैविध्यपूर्ण विषयांवरील कमीतकमी एक तरी पुस्तक वाचलेच पाहिजे. डॉक्टर कलाम यांच्या स्मृती जागविण्याच्या निमित्ताने जागोजागी वाचन कट्टे स्थापन केले पाहिजेत. *वाचाल तर वाचाल* या प्रसिद्ध उक्तीवर प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज आहे. वाचनाने माणसाची बुद्धी विकसित होते. त्याच्या चिकित्सक बुद्धीचा विकास होतो. प्रत्येक पुस्तकातून नवीन विचार मिळतो. नवीन अनुभवाची अप्रत्यक्षपणे अनुभूती मिळते, शिदोरी मिळते. ज्ञानाच्या कक्षा आपोआप रुंदावत जातात. त्यातूनच सुखाचे दरवाजे उघडत जातात. समृद्धी अधिकाधिक वृद्धिंगत होत जाते. सुखसमाधान, आनंदाच्या संकल्पना बदलत जातात. भौतिक सुखा समाधानाच्या पलीकडे असलेला, शुद्ध वैचारिक गुणवत्तेचे अधिष्ठान असलेला, सोन्याप्रमाणे आगीत तावून सुलाखून निघालेल्या प्रमाणे रसरशीत अनुपम आनंद मिळत जातो. प्रत्येक नागरिकाने वाचन केले तर सुसंस्कृत सुज्ञ समाज घडेल. त्यातूनच समृद्धी प्राप्त होऊन देश समृद्ध होईल. वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
देशाच्या आजच्या सामाजिक दुर्दशेस वाचनाचा अभाव हेच कारण आहे. आजचा समाज खरे काय नि खोटे काय हे पारखण्याची क्षमताही गमावून बसला आहे. खऱ्या-खोट्याची पारख पुस्तके करून देतात. त्यातूनच आपणास निष्कंटक मार्ग सापडतो. म्हणूनच वाचन केले पाहिजे. अखेरीस आपणास वाचायचे असेल तर वाचलेच पाहिजे. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने आपणास वाचनासाठी प्रेरणा मिळून आपले शास्वत कल्याण होवो हीच शुभेच्छा!