मुंब्रा ते भिवंडी दरम्यान चालवण्यात येणारी टीएमटी बस शिळफाटा येथून चालवावी, सवेरा फाऊंडेशनची मागणी !!

मुंब्रा ते भिवंडी दरम्यान चालवण्यात येणारी टीएमटी बस शिळफाटा येथून चालवावी, सवेरा फाऊंडेशनची मागणी !!

       मुंब्रा ते भिवंडी दरम्यान चालवण्यात येणारी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची बस सेवा शिळ फाटा येथून चालवण्यात यावी, अशी मागणी सवेरा फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. सवेरा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य शमीम खान यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. शमीम खान यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आगामी सभेमध्ये ही मागणी मांडण्याची ग्वाही दिली.

        शमीम खान यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सवेरा फाऊंडेशनचे अध्यक्ष अन्वारुल हक खान, सचिव एड खलील गिरकर, सय्यद जाहीद अली, इब्राहिम शेख, इम्तियाज मंसूरी, झुल्फिकार सईदी, परवेज खान, अश्रफ खान आझमी, फरीद शेख यांचा समावेश होता.

         सध्या या बस सेवेच्या चार फेऱ्या भारत गिअर कंपनी ते भिवंडीतील शिवाजी चौक या मार्गावर चालवल्या जात आहेत तर उर्वरीत फेऱ्या मुंब्रा अग्निशमन दलाच्या कार्यालय ते भिवंडी या मार्गावर चालवल्या जात आहेत.  

        मात्र बहुसंख्य प्रवाशांना या बस फेऱ्यांच्या वेळापत्रकाची माहिती नसल्याने त्यांना या सेवेचा लाभ घेता येत नाही. मुंब्रा येथील सर्व बस थांब्यावर या सेवेच्या मार्गाची व वेळापत्रकाची माहिती लावावी, भिवंडी व मुंब्रा दरम्यान चालवण्यात येणाऱ्या बस मुंब्र्यातील सर्व बस थांब्यावर थांबवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Batmikar
विशेष प्रतिनिधी - खलील गिरकर