रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित स्वाक्षरी अभियानाला चांगला प्रतिसाद,

रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित स्वाक्षरी अभियानाला चांगला प्रतिसाद,

      ५० हजार स्वाक्षऱ्यांसहित डीआरएम, रेल्वे मंत्र्यांना निवेदन देणार !!

         मुंब्रा रेल्वे स्थानकातून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर मोहिमेला मुंब्रावासीय प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या हस्ताक्षर मोहिमेत सुमारे ५० हजार स्वाक्षऱ्या जमवण्यात आयोजकांना यश आले आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील एम गेट जवळ दररोज प्रवाशांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. स्थानिक आमदार, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवण्यात आले. 

          सुमारे ५० हजार रेल्वे प्रवाशांच्या स्वाक्षऱ्यांसहित रेल्वेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे.

       मुंब्रा येथील रेल्वे स्थानकातील फलाटांची संख्या २ वरुन ४ करण्यात आली मात्र त्यानंतरही मुंब्रा येथे जलद गाड्यांना थांबा देण्यासाठी पूर्वीप्रमाणेच टाळाटाळ होत आहे. सकाळी गर्दीच्या वेळी अप मार्गावर ठाणे-मुंबईच्या दिशेने प्रवाशांना लोकलमध्ये चढणे जिकीरीचे होऊन बसले आहे. प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांवर लोकलमध्ये लटकून प्रवास करण्याची वेळ येते व त्यामुळे अनेकदा हात सुटल्याने अपघात घडून प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत. प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकाळी गर्दीच्या वेळी एसी लोकल चालवण्याऐवजी साध्या लोकलची संख्या वाढवावी, मुंब्रा स्थानकातील प्रलंबित सरकता जिना लवकर बनवावा, मुंब्रा रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या जलद गाड्यांची संख्या अधिक वाढवावी, मुंब्रा- दिवा-कळवा येथील प्रवाशांसाठी दिवा येथून विशेष गाडी सुरु करावी. मुंब्रा रेल्वे स्थानकातून जो महसूल रेल्वे प्रशासनाला मिळतो त्यापैकी प्रवासी सुविधांवर अधिक खर्च करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.

       प्रवाशांनी या अभियानाला अतिशय उत्तम प्रतिसाद दिला व आमच्या अपेक्षेप्रमाणे सुमारे ५० हजार प्रवाशांनी या मागण्यांसाठी हस्ताक्षर करुन रेल्वे प्रशासनाने या मागण्यांची त्वरित दखल घ्यावी व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केल्याची माहिती शमीम खान यांनी दिली. 

          या हस्ताक्षर मोहिमेसाठी शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक जफर नोमाणी, रेहान पितलवाला, इम्रान सुर्मे, नेहा नाईक, सेहर युनुस शेख, पूजा खान, सकिना खान, संगीता पालेकर दवणे, फिरदोस काझी, आशा काझी, आलिया शेख, रेश्मा सय्यद, रुबीना शेख, शबाना शेख, नौशिन सय्यद, सलमा खान, तबस्सूम शेख, इम्तियाज ऊर्दू, शोएब खान यांच्यासहित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. 

          या प्रश्नी सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रवासी महासंघासोबत बैठक घेऊन रेल्वे प्रशासनाची भेट घेतली होती व आंदोलनाचा इशारा दिला होता. रेल्वे प्रशासनाला स्वाक्षऱ्यांसहित निवेदन देऊन उपाययोजना आखण्याची मागणी आता करण्यात येणार आहे अन्यथा याबाबत पुढील पाऊल उचलण्यात येईल, असे सांगण्यात आले.


Batmikar
विशेष प्रतिनिधी - खलील गिरकर