तेजस ठाकरे होणार युवासेनाप्रमुख, कामगार नेते निशिकांत शिंदे यांची माहिती !!

तेजस ठाकरे होणार युवासेनाप्रमुख, कामगार नेते निशिकांत शिंदे यांची माहिती !!

      एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत निम्म्याहून अधिक शिवसेना आमदार आपल्यासोबत घेऊन भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. शिवाय मुख्यमंत्री देखील झाले. या धक्क्यातून सावरत असलेल्या शिवसेनेला शिंदे गटाकडून अजुनही धक्क्यावर धक्के देण्यात येत आहेत. शिवसेनेचे खासदारही आपल्याकडे वळविण्यात शिंदे यांना यश आलं आहे. त्यामुळे शिवसेना पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख आपला हुकमी एक्का काढण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे.

       उद्धव यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे लवकरच राजकारणाचे मैदान गाजविण्यासाठी सज्ज होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव यांच्यानंतर आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय झाले. आदित्य यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी आहे. मात्र शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आदित्य ठाकरे यांच्यावरची जबाबदारी वाढली असून आदित्य यांनी देखील जबाबदारीचा शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिवसेना सावरण्याच्या प्रयत्नात आदित्य यांना तेजस ठाकरे यांची साथ मिळण्याची शक्यता आहे.

       तेजस ठाकरे यांची काम करण्याची पद्धत आम्ही जवळून पहिली असून त्यांची नियुक्ती युवासेना अध्यक्षपदासाठी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर शिवसेना पक्षप्रमुखपद हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस, कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी दिली. जेणेकरून शिवसेनेतील महत्त्वपूर्ण निर्णय घेणे आदित्य यांना शक्य होईल.



Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week