महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते मुंबई ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेता प्रतिनिधींचा सक्तार !
महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते मुंबई ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेता प्रतिनिधींचा सक्तार !
कोरोना संकट काळात वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपले वृत्तपत्र वितरणाचे काम चोखपणे बजावले. विश्वासार्ह माहिती देणारे एकमेव माध्यम - वर्तमानपत्र, विक्रेत्यांच्या अथक मेहनतीमुळे सर्वदूर उपलब्ध होत होते. पाऊस आणि कोरोना काळ या दुहेरी संकटांचा सामना करून घरोघरी व स्टॉलवर वृत्तपत्र उपलब्ध करून दिली जात होती. मा. महापौर किशोरी पेडणेकर (मुंबई) यांनी या गोष्टीची दखल घेतली.
वृत्तपत्र विक्रेता प्रतिनिधींचा सन्मान शाखा क्रमांक १९९ च्या वतीने रविवार दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी महापौर निवासस्थानी करण्यात आला. महापौरांच्या हस्ते सन्मानपत्र व भेटवस्तु देऊन विक्रेत्या प्रतिनिधींना गौरविण्यात आले. समारंभाला शाखाप्रमुख श्री. गोपाळ खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महापौरांनी वृत्तपत्र प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले की तुमचा उद्योग छोटा दिसत असला तरी वृत्तपत्र या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविले जाणारे विचार, माहिती आणि संदेश यांची व्याप्ती प्रचंड आहे. तुम्ही सर्व विक्रेते लोकांपर्यंत क्रांतिकारक विचार पोहोचविणारे क्रांतिकारक आहात. ज्याप्रमाणे पोट भरण्यासाठी अन्न लागते त्याचप्रमाणे बुद्धीला लागणारा खुराक तुम्ही वर्तमानपत्राद्वारे नियमितपणे पोहोचवत असता. तुमच्या कार्याला मानाचा मुजरा. महापौर निवासस्थान ही बाळासाहेबांच्या पुण्याईची वास्तू आहे व या वास्तूत विक्रेत्यांनी आपल्या माता-भगिनींना सुद्धा घेऊन यावे, असे जिव्हाळ्याचे आमंत्रण त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना दिले. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने कोरोना काळात असंख्य वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत, हाॅस्पिटल किंवा वैद्यकीय मदत, इतर सहकार्य करणारे दैनिक सामनाचे महाव्यवस्थापक श्री. दीपक शिंदे यांचा सत्कार महापौर सौ. किशोरीताई पेडेणेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने संजय चौकेकर व जीवन भोसले यांनी महापौर किशोरीताई पेडणेकर व गोपाळ खाड्ये यांचे मन: पूर्वक आभार मानले.