कोरोना विरोधात कृती दल स्थापनेची गरज !

कोरोना विरोधात कृती दल स्थापनेची गरज !

     गावं खेड्यापासून मेट्रो सिटी पर्यंत सर्वत्र देशभर कोरोना विषाणू यमदूताची दहशत माजली आहे. या प्रसंगी या भीषण संकटास तोंड देण्यासाठी संपूर्ण देश दैनिक सामान्य जीवन व्यवहारातील भेदाभेद विसरून एकसंध भावनेने ठाम उभा ठाकला आहे हे दृश्य अभिमानास्पद आहे. हजारो डाॅक्टर्स, नर्सेस, पोलिस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि पत्रकार स्वत:चे व स्वत:च्या कुटुंबियांचे प्राण धोक्यात घालून कोरोनाविरुद्ध अहोरात्र लढत आहेत. या सर्वांना भावोत्कट सलाम. देश या सर्व जनसेवकांचा अत्यंत ऋणी आहे. त्याखेरीज अनेक समाजसेवक, स्वयंसेवी संस्था, राजकीय संस्था या यमदूतास स्वत:पासून,  कुटुंबापासून, आणि आपल्या वस्तीस्थानापासून दूर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते आपापल्यापरीने वेगवेगळ्या उपाय योजना राबवित आहेत. कुणी मास्क आणि सेंटिनायजर मोफत वाटत आहेत, कुणी गरीब गरजवंतांना मोफत अन्नधान्य व पैसे वितरीत करीत आहेत, कुणी रक्तदान शिबीरे आयोजित करीत आहेत, तर कुणी आपापल्या रहिवासी इमारतीत जंतुनाशक द्रवाची फवारणी करून घेत आहेत. या सर्वांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. हे सर्व पाहिल्यावर, आपल्या भारतीय समाजाची त्यागशील वृत्ती, मनामनात वसत असलेला एकमेकाविषयीचा तीव्र जिव्हाळा, प्रेम पाहिल्यावर या देशात आपण जन्माला आलो याचा अभिमान वाटतो. छाती गर्वाने फुगून येते. खरं तर आपले जनसैनिक एवढ्या मोठ्या ताकदीने लढत असताना कोरोना विषाणू राक्षस इतक्यात गारद व्हावयास हवा होता. पण दुर्दैवाने तसे घडत नाहीये. कारण या कोरोनाची विघातक ताकद प्रचंड आहे. त्याच्या भयंकर विनाशकारी ताकदीचा आपणास अंदाज आलाय. परंतु या राक्षसाचा जीव कुठल्या मडक्यात लपवून ठेवलेला आहे हेच कळत नसल्याने त्याच्यावर सोडलेली आपली सगळी अस्त्रे वाया जात आहेत.  एकंदरीत ही घनघोर लढाई दिर्घकाळ चालणार आहे. त्यासाठीच जनपातळीवर आपण अधिक सावध राहणे गरजेचे आहे. त्यासाठी कोरोनाच्या प्रसारास अधिक तीव्रतेने कसा आळा घातला येईल यावर अधिक तपशीलात शिरून विचार करण्याची गरज आहे. सोसायटीतील इमारती, वाड्या, पाडे, चाळीचाळीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी केवळ जंतुनाशक द्रवाची फवारणी करवून घेतल्याने भागणार नाही. त्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांचे कृतीदल स्थापन करण्याची गरज आहे.

       लॉकडाऊनच्या काळात रहिवाशांनी घराबाहेर पडू नये यासाठी या कृतीदलाने कठोरपणे दक्ष राहिले पाहिजे. इमारतींतील रहिवाशांनी जीवनावश्यक वस्तू किंवा औषधांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणे अपरिहार्य आहे. त्यासाठी कृतीदलाने पुढे येऊन त्यांना या वस्तू बाजारातून वाजवी दरात घरात आणून देणे आवश्यक आहे. इमारतीतील प्रत्येक रहिवाशाच्या आरोग्याची तपशीलवार नोंद एका वहीत ठेवून त्याच्या शारीरिक आरोग्यविषयक बदलांबाबत दक्ष राहावे लागेल. त्याच्या अलिकडच्या परदेशवारीच्या इतिहासाचीही माहिती करून घेणे आवश्यक आहे. रहिवाशांना भेटण्यासाठी येणाऱ्या बाहेरच्या पैपाहुण्यांना अटकाव केला पाहिजे. भेट घेणे अपरिहार्यच असेल तर त्याला इमारतीत प्रवेश देण्यापूर्वी त्याच्या अलिकडच्या परदेशवारीचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. त्याच्या हातावरील शिक्क्यावरून तो "क्वारंटाईन" खाली नाही याची, तसेच तो कुणा कोरोना पीडित व्यक्तीच्या सहवासात आला आहे की नाही याबाबत पडताळणी करून घेण्याची गरज आहे. तसा कुणी आढळल्यास त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचीही गरज आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत रहिवाशांचे कोरोना विषाणू प्रतिरोधविषयक वारंवार साबणाने हात धुणे, खोकताना किंवा शिंकताना रुमाल तोंडावर धरावा, आपल्या खोकल्यातील, शिंकेतील किंवा लाळेतील द्रवाचे थेंब बाहेर उडू नये याची काळजी घेणे, दुसऱ्या व्यक्तीपासून कमीत कमी तीन फूट दूर अंतर राखणे, घराबाहेर न पडणे इत्यादी, तसेच सामान्य आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी याबाबत तपशीलवार समुपदेशन करण्याची गरज आहे.

    यासर्व गोष्टी कायदा हातात न घेता, सामाजिक शांतता, सौहार्दास तडा जाऊ न देता संयम, सहनशीलतापूर्वक करण्याची गरज आहे. तज्ज्ञ डॉक्टर व सरकारी आदेशांचाही आदर करणे आवश्यक आहे. आजकाल अतिउत्साही तरुणांनी घराबाहेर पडून स्वत:चे, स्वत:च्या कुटुंबीयांचे, तसेच सार्वजनिक आरोग्याचे तीनतेरा वाजविण्याचे  प्रकार घडत आहेत. आपल्या भन्नाट रेखाटनाद्वारे अशा अघोरी वर्तनाच्या भभयंकर परिणामांवर  कल्पकतेने भाष्य करणारे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांचे कलात्मक व्यंगचित्र भीषण वास्तव व्यक्त करते. कृतीदलाने आपल्या संघटित बळाच्या जोरावर अशा तरुणांनाही काबूत ठेवण्याचे प्रयत्न करून समाजाला उपकृत करण्याची गरज आहे.

   असेही कोराना विषाणू विरुद्धचे हे युद्ध आपणच जिंकणार आहोत हे निश्चित असले तरी अशा कृतीदलाच्या साहाय्याने हा विजय आपण लवकरात लवकर पदरात पाडून घेऊ शकतो, एवढेच!


Batmikar
जेष्ठ पत्रकार - अशोक सावंत

Most Popular News of this Week