जागतिक महिला दिनी समाजाला माहीत नसलेल्या कष्टकरी,राबणाऱ्या हातांचा अनोखा सन्मान !

जागतिक महिला दिनी समाजाला माहीत नसलेल्या कष्टकरी,राबणाऱ्या हातांचा अनोखा सन्मान !

     जागतिक महिला दिन ८ मार्च सर्वत्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होताना दिसतोय अशावेळी समाजातील कष्टकरी,अहोरात्र राबणाऱ्या सर्वांची काळजी वाहणाऱ्या, "खानावळ" वाढून अन्नदानासारखे पवित्र कार्य अतिशय माफक दरात उपलब्ध करून नेटका प्रपंच उभ्या करणाऱ्या माऊलींचा सन्मान कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई च्या वतीने होतोय ही गोष्टच मनाला समाधान देणारी.

    "खानावळ" हा शब्द तसा मुंबईत स्वातंत्र पुर्व काळापासुन असुन नवीन नाही, हां आता मात्र या कात टाकलेल्या स्वप्ननगरीत "खानावळ" जावून "मेस"हा सुशिक्षित शब्द मात्र  नक्कीच रूजू होऊ लागलाय लालबाग, परळ, डीलाईलरोड,भायखळा, वरळी, शिवडी हा तसा गिरणगांव सकाळी सकाळी गिरणीचा कानटळ्या बसवनारा पण हवाहवासा वाटणारा तो आवाज (भोंगा) वाजायच्या आत खानावळी वाढणाऱ्या माऊलींची अर्धी अधिक कामे उरकलेली असायची, तशी दिवसाची सुरुवात भोंग्यानेच व्हायची गिरणगावात गजर म्हणजेच गिरणीचा भोंगा अस समीकरण ठरलेल असायच. 

   सकाळी पहाटे चार वाजताच या माऊलीचा दिवस चालू व्हायचा परात भर मळलेला तो पिटाचा गोळा पाहिला कि आजकालच्या तरुणींना पोटात गोळा येईल!! इकडे ती माऊली चपात्या लाटायची व त्याच तत्परतेने लाटलेल्या त्या चपात्या माऊलीचे पती त्या फरफरणाऱ्या स्टोव्ह वरून भाजून खाली चपातीच्या बुटीत म्हणजेच (शिबडे) टाकायचे. पूर्वी रातपाळीवरून आलेले गिरणीकामगार सकाळी चहा चपाती खायला खाणावळीच्या घरीच जायचे. सकाळी गेलेले कामगार दुपारी चहा, चपाती खायला पुन्हा खानावळी कडे जायचे. जवळ जवळ एकाएका खाणावळीकडे ३० ते ४० लोक जेवायला असायचे येवड्या सगळ्यांचे जेवण बिचारी हि एकटी माऊली करत असे बहुतांशी गिरणी कामगार हे पश्चिम महाराष्ट्र कोकण मधील आणि खानावळ वाढणारी माऊली हि याच भागातील असल्याकारणाने एक भावनिक नाळ जोडली गेली असायची.भायखळा दादर येथून भाजीपाला आणणे, रेशनींग मधून धान्य कधी रॉकेल आणणे हि कामे देखील या भावनिक नाळेमुळे कित्येक कामगार आनंदाने करायचे. सणासुदीची मजा तर औरच दिवाळीत फराळाचा बेत तर ठरलेलाच दर बुधवार, रविवार चिकन, मासे असा बेत न चुकता असायचा.

         छोट्याश्या खोलीत ईकडे तिकडे फिरायला जागा नसायची. जेवायला येणारी लोकं, डबे घेऊन जाणारी लोकं काहीवेळा घरीच येऊन जेवणारी लोक पंगतीच्या पंगती उठायच्या ती सर्व ताटे, डबे, खरकटी भांडी घासून पुसुन ठेवी पर्यंत दुपार व्हायची अर्धा एकतास आराम करतोय तोच रात्रीच्या जेवणाची तयारी चालू व्हायची.

          गाववाल्यांच्या खोलीत राहणाऱ्या लोकांच्यावरच हा व्यवसाय आजही चालू आहे. आजही या डिलाईल रोड विभागात ४६५ ग्रामस्थ गाळे आहेत येथे राहणारी सर्वच मंडळी या माऊलींच्या खानावळीत आजही जेवत आहेत. गेली 60 वर्षां पेक्षा जास्त खानावळीची परंपरा आज हि या गिरणगावात चालू आहे. 

      आणि म्हणूनच अतिशय माफक दरात अन्नदानासारखे पवित्र कार्य करत आपला प्रपंच, संसार नेटका करत मुलांचे शिक्षण, संसार गाडा चालवण्यासाठी राबणाऱ्या हातांचा पण थोड्याशा दुर्लक्षित असणाऱ्या माऊलींचा सन्मान जागतिक महिला दिनी करताना कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष श्री रविंद्र देसाई, कार्याध्यक्ष श्री राजू येरुडकर, सचिव श्री कृष्णा पाटील, सल्लागार श्री जीवन भोसले व सर्व सहकार्यानी केला.


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week