
कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल !
कोविड १९ आजारावरील कोविशील्ड या लसीचा पहिला साठा आज (१३ जानेवारी २०२१) सकाळी ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे १६ जानेवारी रोजी लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती.
एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लस साठा वाहनाचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे.