कवी केशवसुतांच्या स्मारकास अनुदान मिळावे !

कवी केशवसुतांच्या स्मारकास अनुदान मिळावे !

  गणपती पुळ्या जवळील  मालगुंड येथील आद्य क्रांतिकारक कवी केशवसुत यांच्या स्मारकास भेट देण्याचा भावपूर्ण योग नुकताच जुळून आला.


     केशवसुतांचे हे मूळ जन्मस्थान आणि  कर्मस्थानही.  त्यांच्या येथील वास्तव्यामुळे या घरास  साहित्यप्रेमींच्या हृदयात एक अलौकिक स्थान प्राप्त झाले आहे. या वास्तूत प्रवेश करताच कधीकाळी येथे कवी केशवसुतांचे प्रत्यक्ष वास्तव्य होते या जाणीवेने संपूर्ण देह रोमांचित होऊन भावना उचंबळून येतात. त्यांची प्रत्येक स्फुर्तीदायी कविता तुतारी फुंकून आजच्या सामाजिक व राजकीय अराजकाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी उत्तेजित करीत असते. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्या संकल्पनेतून आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कृतीतून हे स्मारक उभे राहिले आहे. मराठी साहित्यातील सर्वोच्च मानदंड मानल्या गेलेल्या कवि केशवसुतांचे हे स्मारक प्रत्येक मराठी भाषिकास अभिमानास्पद असून सामाजिक स्वच्छता अभियानास स्फुर्ती देणारे आहे. या स्मारकाच्या माध्यमातून मराठी भाषेचा विकास आणि प्रसार होऊन ती  वृद्धिंगत होण्याचे कार्य नक्कीच घडत आहे. परंतु खेद याचा वाटतो की या स्मारकाच्या देखभालीसाठी मराठी भाषेची तरफदारी करणाऱ्या महाराष्ट्र सरकारकडून अजूनही अनुदान मिळत नाही. त्यामुळे खर्चाची जुळवणी करताना 'कोमसाप' ची दमछाक होत आहे. सामाजिक उत्थानासाठी अशा स्मारकांचे जतन करणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. तरी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेतच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने या स्मारकास अनुदान द्यावे ही अपेक्षा.


Batmikar
जेष्ठ पत्रकार - अशोक सावंत

Most Popular News of this Week