
मुंबई मराठी माणसाचीच !!
लोअर परळ मुंबईची भाषा, घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईत राहणाऱ्या लोकांना मराठी भाषा आलीच पाहिजे असे नाही" असे मत रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मध्यंतरी व्यक्त केले.
त्यावर विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांना स्पष्ट करावे लागले की, की. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. हे ठीक असले तरी भैयाजी जोशी यांचे वक्तव्य निषेधार्हच आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. शिवाय महाराष्ट्राने गुजरातला कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमी लोकांना माहीत असेल. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषिक राज्य निर्माण करतेवेळी महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये अस्तित्वात येणार, ही काळ्या दगडावरची रेघ ठरवल्यानंतर (तत्पूर्वी द्विभाषा राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते.) राज्य घटनेच्या सातव्या व आठव्या परिशिष्टमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कलम ४२ (२). ४८ (१) ५१ (५) अनुसार गुजरात राज्याची राजधानी विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याचा कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाऊंटमधून दहा कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी, असे प्रस्तावित करण्यात आले.
त्यानंतर गुजरात राज्याची वार्षिक तूट भरून काढण्यासाठी १९६० मध्ये ६.०२ कोटींपासून सुरुवात करून १९६९-७० पर्यंत १.१४ कोटी अशा क्रमाने रक्कम द्यावी असे ठरले. याखेरीज १९६२-६३ पासून १९६९-७० या आठ वर्षांत गुजरातला २८.३९ कोटींचा लाभ व्हावा असा निर्णय झाला. बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्टच्या कलम ५२ खाली महाराष्ट्राने गुजरातला १९६२-६३ साली ६१२ लाख, १९६३-६४ साली ५८२ लाख, ६४-६५ साली ५०१ लाख, ६५-६६ साली ५२६ लाख, ६७-६८ साली २०९ लाख असे एकूण ३२ कोटी ६६ लाख दिले. यात नव्या तरतुदीनुसार दिलेले ३८ कोटी धरून ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे. याचा अर्थ मुंबईसाठी महाराष्ट्राला ६० कोटी ६६ लाख रुपये एवढी किंमतदेखील मोजावी लागली आहे. अशा परिस्थितीत मुंबई कोणाच्या बापाची नाही. मुंबई मराठी माणसांचीच होती, आहे आणि राहील.