
वरळी पोलिसांची यशस्वी कामगिरी, तीन वर्षीय मुलीची अपहरणातून सुटका !!
वरळी पोलिसांची यशस्वी कामगिरी, तीन वर्षीय मुलीची अपहरणातून सुटका !!
दि. 29/01/2025 रोजी सकाळी 12:30 ते 12:45 वाजता च्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या बाहेरील अंगणातुन/गल्लीतुन फिर्यादी यांची मुलगी, वय ०३ वर्षे, हिस अनोळखी महिलेने तिच्या कायदेशीर रखवालीतुन फूस लावुन पळवून नेल्याने अनोळखी महिलेच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने मा. मुंबई पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, मा. सह पोलीस आयुक्त श्री सत्यनारायण चौधरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग श्री अनिल पारसकर, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ श्री दत्तात्रय कांबळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वरळी विभाग श्री दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली....
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र काटकर यांनी दिवसपाळी परिवेक्षक अधिकारी सपोनि कुणाल रूपवते, महिला पोलीस उपनिरीक्षक उषा मस्कर, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव व पथक तसेच पोलीस शिपाई सावकार, घुगरे, खाडे, पोलीस हवालदार पाटील व दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस हवालदार परब, कुंभार, महिला पोलीस शिपाई खाके, गावडे यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवुन त्यांना काम सोपवण्यात आले.
त्या टिम मधील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव व पथक यांनी संपुर्ण प्रेमनगर परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता, गंगाराम लॉन्ड्री गल्ली येथील किराणा दुकानाच्या केवळ एका सी सी टी व्ही फुटेज वरती कसून तपास करून नमुद गुन्हयातील साक्षीदार यांनी दिलेल्या जबाबातील सांगण्याप्रमाणे गुन्हयातील संशयित महिला ही अपहरण झालेल्या बळीत मुली सोबत १२:४९ वा. दिसुन आली. त्यात सी सी टी व्ही फुटेजचे व्हिडीओ रेकॉर्डीग बनवुन पोलीस ठाणेच्या व्हाट्सअप ग्रुप तसेच मोहल्ला कमिटीच्या व्हाट्सअप ग्रुप वरती तसेच तेथील स्थानिक लोकांना पाठवले, त्यानुसार वरिष्ठांनी तपासाच्या अनुषंगाने केलेल्या मार्गदर्शना नुमार प्रेमनगर परिसरामध्ये नमुद टिमने कोम्बींग ऑपरेशन राबवुन स्थानिक लोकांच्या मदतीने संपुर्ण झोपडपट्टीमध्ये घरोघरी शोध घेतला असता, रूम नं. ५२०, प्रेमनगर, बी जे खैर मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई या ठिकाणी संशयित महिला ही बळीत मुली सोबत मिळून आली.
नमुद महिला आरोपीच्या तपासादरम्यान तिचे नाव श्रीमती दिपाली बबलु दास, वय ४० वर्षे, व्यवसाय-पेंशट सांभाळणे (आया), राहणार प्रेमनगर, वरळी नाका, वरळी असे निष्पन्न झालेले आहे.
तीन तासात प्रेमनगर झोपडपट्टी परिसरात तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण करून पसार झालेल्या महिलेस कसुन तपास करून अपहरण झालेल्या मुलीची सुटका करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्याची यशस्वी कामगिरी पोलिसांनी केलेली आहे.
याबाबत वरळीकर जनतेने व स्थानिकांनी वरळी पोलीस स्थानकाचे व पोलीस दलाचे आभार मानलेले आहेत.