मत्स्य दुष्काळामुळे बोटी बंद !!
यंदाच्या वर्षी समुद्रात निर्माण झालेल्या मत्स्य दुष्काळामुळे वसई अर्नाळा परिसरातील मच्छीमारांवर स्वतःहून 40 दिवस बोटी बंद ठेवण्याची पाळी आलेली आहे. या बंदी नंतर बंदरातून काही बोटी मासेमारीसाठी रवाना होऊ लागल्या आहेत. तर वसई येथील मच्छीमारांनी 5 मार्च पर्यंत बोटी बंद ठेवलेल्या आहेत. वसई विरारच्या किनारपट्टीच्या भागात हे मोठ्या प्रमाणात मच्छीमार बांधव मच्छीमारीचा व्यवसाय करतात. एकापाठोपाठ येणारी वादळे खराब हवामान यामुळे पाण्याच्या अंतर्गत प्रवाहामध्ये होणरे बदल, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मासेमारी करण्यास बाधा येत असून मच्छीमार पूर्ण क्षमतेने मासेमारी करू शकत नाहीत. दुसरीकडे पारंपारिक पद्धत सोडून नियमबाह्य पद्धतीने अनिर्बंध मासेमारी होऊ लागली आहे.
यामध्ये विशेषतः माशांचा प्रजनन काळ व वाढीचा काळ यामध्येही होत असलेल्या मासेमारीमुळे मासळीचे साठे ही नष्ट होऊ लागले आहेत. ह्या वर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून हव्या त्या प्रमाणात मासळी मच्छीमाऱ्यांच्या जाळ्यात आली नसल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले आहे. लाखो रुपये खर्च करून मैल न मैल प्रवास करूनही मासळी जाळ्यात येत नसल्याने मोठा फटका बसलेला आहे.
मत्स्य दुष्काळ असल्यामुळे अनेक मच्छीमारांची कुटुंब संकटात आली आहेत. या मत्स्य दुष्काळावर मात करण्यासाठी वसई व अर्नाळा येथील मच्छीमार बांधवांनी एकत्रित येत सुमारे 40 दिवस मच्छीमारी बंद ठेवली होती. जेणेकरून समुद्रातील मत्स्य प्रजातीची प्रजननस वाढ होण्यास मदत होईल, चांगल्या दर्जाचे मासे जाळ्यात येतील. अशी आशा आहे परंतु अडचणी वाढत असल्यामुळे काही मच्छीमारांनी आपल्या बोटी मासेमारीसाठी पुन्हा समुद्रात रवाना केलेल्या आहेत.
तर वसई पाचू बंदर येथील मच्छीमार अजूनही काही दिवस बोटी बंद ठेवणार असल्याचे सांगितले. यावर्षी समुद्रात मिळणारे मासळी कमी झाली आहे, त्यामुळे आता आम्हीच एकत्रित येऊन बोटी बंद ठेवल्या होत्या आणि आता पुन्हा मासेमारीसाठी बोटी सोडत आहोत. शासनाने सुद्धा आमच्या मच्छीमार बांधवांची योग्य दखल घेऊन मदत करावी. असे मासेमार सांगत आहेत.
अर्नाळा येथील मच्छीमार म्हणाले की यावर्षी मासळीची आवक घटली आहे, त्यामुळे मच्छीमारांना योग्य ते मच्छीचे उत्पादन न झाल्यामुळे कर्जबाजारी होत असून त्यांच्यासमोर भविष्याचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे मत्स्यमारांचे प्रश्न शासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. मच्छीमारांवर उडवलेल्या या अत्यंत बिकट परिस्थितीचा विचार करून, राज्यात मच्छीचा दुष्काळ जाहीर करावा असे मच्छीमारांनी सांगितले आहे.