
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1000 कोटीं पेक्षा जास्त वसुली, ८६ पॅनल द्वारे १३ हजार ३५५ प्रकरणे निकाली काढण्यात यश !!
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1000 कोटीं पेक्षा जास्त वसुली, ८६ पॅनल द्वारे १३ हजार ३५५ प्रकरणे निकाली काढण्यात यश !!
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मुंबईत 1000 कोटीं पेक्षा जास्त वसुली करण्यात आली. ८६ पॅनलच्या माध्यमातून एका दिवसात १३ हजार ३५५ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले.
मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने मुंबई शहरातील विविध न्यायालयामध्ये प्रधान न्यायाधीश अनील सुब्रम्हण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शहरामध्ये एकूण 86 पॅनल स्थापन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 1 लाख 19 हजार 538 प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी 13 हजार 355 प्रकरणे निकाली काढण्यात यश आले. लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या रकमेचे मूल्य 1000 कोटींपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्याकरिता मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अनंत देशमुख यांनी विशेष योगदान दिले.
लोक अदालतीच्या पूर्वी आठवड्याभरात साडेअकरा हजार प्रकरणे निकाली
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या पार्श्वभूमीवर मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या अधिपत्याखाली मुंबई मधील सर्व फौजदारी न्यायालयामध्ये विशेष मोहिमे अंतर्गत 6 फेब्रावरी ते 10 फेब्रुवारी या काळात 11 हजार 577 प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यात आला. सदर मोहीम ही नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबईचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रम्हण्यम व मुख्य महानगर दंडाधिकारी एम. आर. ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आल्याची माहिती मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनंत देशमुख यांनी दिली.