
कायदेविषयक साक्षरता अभियानाच्या महाशिबिराला चांगला प्रतिसाद !!
कायदेविषयक साक्षरता अभियानाच्या महाशिबिराला चांगला प्रतिसाद !!
सुमारे १०० हून अधिक न्यायाधीशांची पदयात्रा !!
शनिवारी १२ नोव्हेंबरला होत असलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटवण्याचे उद्दिष्ट !!
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत अखिल भारतीय संपर्क व कायदेविषयक साक्षरता अभियान ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई जिल्हा व उपनगर विधी सेवा प्राधिकरण तसेच मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विदयमाने एस.एन.डी.टी. महिला विदयापीठ, चर्चगेट येथे महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर महाशिबीरात नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथून नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश तथा मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यम् यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च फॉर एक्सेस टु जस्टिस या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व महानगर दंडाधिकारी अशा एकूण सुमारे १०० ते १२५ न्यायाधीशांचा समावेश होता. त्याशिवाय विधी महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
महाशिबीराला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता उपस्थित होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश व मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यम्, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा, उप सचिव मिलिंद तोडकर, कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश तथा मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा स्वाती चौहान, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर उपस्थित होते.
महाशिबीरात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व शासनाच्या विविध विभागातील योजनांचा प्रसार व प्रचार होण्याच्या दृष्टीने स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्या स्टॉल्सचे उद्घाटन न्यायमूर्ती कमल खता यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. महाशिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपटयांना पाणी घालून करण्यात आले.
जनतेसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी नवीन अॅप लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.
मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश स्वाती चौहान यांनी मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश तथा मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यम् यांनी प्रत्येक नागरिकाला विधी सहाय व सेवा मिळण्याकरिता जास्तीत जास्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करुन तळागाळातील जनतेपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. सर्वांना बरोबर घेऊन चालू व त्यांची साथ देऊ असे ते म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता यांनी सामाजिक संस्था व त्यांचे प्रतिनिधी, पॅरा लिगल क्षेत्रातील स्वयंसेवक यांच्या कामाचे कौतूक केले.
न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, दिनेश सुराणा यांनी देखील स्टॉल्सना भेटी दिल्या व त्यांच्या योजनांबाबतची माहिती घेतली तसेच शनिवार 12 नोव्हेंबर, 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन केले.
मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनंत देशमुख यांनी आभार व्यक्त केले. महाशिबीर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनंत देशमुख, मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतिश हिवाळे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी मोलाची कामगिरी केली.